पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मध्ये राजवाड्याच्या देवघरातील धार्मिक विधींच्या खर्चाचे १,००० पानांचे तपशीलवार बजेट छापून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. स्वत:च्या राजवाड्यातील खासगी धार्मिक विधींचा आर्थिक लेखाजोखा जनतेसमोर पुस्तकरूपाने मांडणारे सयाजीराव कदाचित एकमेव प्रशासक ठरावेत. या पुस्तकामुळे राजवाड्यातील धर्मविधी आणि त्यावर होणाऱ्या खर्चाची अचूक स्थिती सयाजीरावांच्या लक्षात येऊन पुढील धर्मविषयक सुधारणा त्यांना शक्य झाल्याचे निरीक्षण सयाजीरावांच्या खासगी वृत्तांतात सरदेसाईंनी नोंदविले आहे. यासंदर्भात सरदेसाईलिखित सयाजीरावांच्या खासगी वृत्तांतात वर्णन केलेली १८९७ मधील घटना उल्लेखनीय आहे. बडोद्याच्या महाराजांचे कापलेले केस नर्मदा नदीच्या प्रवाहात नेऊन टाकण्याचा रिवाज पूर्वापार चालत होता. त्यानुसार सयाजीरावांचे कापलेले केस नर्मदा नदीत टाकण्यासाठीचा खर्च म्हणून १ जून १८९७ रोजी खानगी कारभाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात ८८ रु. १२ आणे मंजूर केले; परंतु या संदर्भात मागण्यात आलेला इतर खर्च त्यांनी मंजूर केला नाही. सयाजीरावांनी धार्मिक खर्चाला लावलेल्या शिस्तीचे हे उदाहरण आहे

 सयाजीरावांनी राजवाड्यात होणाऱ्या अनावश्यक धर्मविधींचे प्रमाण शक्यतो कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता कमी करण्यावर भर दिला. त्याप्रमाणे राजघराण्यातील व्यक्तींची दृष्ट काढण्याची पद्धत बंद करण्यासंदर्भात २९ मे १९०१ ला

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / १४