पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समर्थ आणि भाऊ मास्तर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार या तिघांनी धर्मविधींचा तपशीलवार शास्त्रार्थ विशद करणारा 'ऐनेराजमेहेल' नावाचा ग्रंथ तयार केला. या ग्रंथाविषयीची सयाजीरावांच्या मनातील आपुलकी आणि आदर विशद करताना सरदेसाई लिहितात, "हे पुस्तक म्हणजे महाराजांच्या नवीन प्रवृत्तीचा केवळ पाया होय. ऐनेराज मेहेलच्या अनेक आवृत्ती आजपर्यंत झाल्या आहेत आणि त्यांतील प्रकरणे पुनःपुनः चर्चा व विचार करून संपूर्ण करण्याकडे महाराजांनी इतके परिश्रम केले आहेत की, बहुधा दुसऱ्या कोणत्याही विषयावर ते केले नसतील.” सर्वसामान्य जनतेतील धर्मविषयक ज्ञानाच्या प्रसारासाठीची सयाजीरावांची धडपड यातून अधोरेखित होते.

 १८८६ चा महाराजांचा हा निर्णय म्हणजे भारतातील धर्मसाक्षरतेचा पहिला प्रयोग ठरतो. कारण राजाने आदेश काढला आणि समाज सुधारला असे होत नसते. कायदा आणि सत्ता हे जरी परिवर्तनासाठी आवश्यक असले तरी त्याबरोबर हजारो वर्षांच्या परंपरा अचानकपणे संपुष्टात येत नसतात. त्यामुळे सरदेसाई म्हणतात त्याप्रमाणे 'ऐनेराजमेहेल' या पुस्तकाच्या लेखनाच्या वेळी महाराजांनी कोणत्याही विषयावर केले नसतील एवढे कष्ट का केले होते हे स्पष्ट होते.

 सर्वसामान्यांना धर्मविषयक ज्ञान उपलब्ध करून देण्याबरोबरच राजवाड्यातील धार्मिक खर्चाचा लेखाजोखाही सयाजीरावांनी त्यांच्यासमोर ठेवला. सयाजीरावांनी १८९२

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / १३