पान:महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजेच आजपासून १२० वर्षांपूर्वी आदेश दिला. या सयाजीराव म्हणतात, "दृष्टी काढण्याचा रिवाज बंद करावा; परंतु देवभोळ्या समजुतीमुळे ही खास प्रसंगी कोणास 'दृष्ट काढल्याने सुख वाटत असल्यास तशी त्याच्या समजुतीस्तव काढण्यास हरकत नाही; मात्र होतकरू मुलांना देवभोळ्या समजुतीचा कित्ता होता होईतोपर्यंत देऊ नये." धर्मविधी बंद करत असताना समाजाची मानसिकता समजून घेण्याची सयाजीरावांची वृत्ती यातून अधोरेखित होते. लहान मुले धार्मिक बाबींच्या आहारी जाऊ नयेत यासाठी घेतलेली काळजी सयाजीरावांची सामान्य जनतेचा धार्मिक दृष्टिकोन निकोप होण्यासाठीची तळमळ स्पष्ट करते.

 सयाजीरावांच्या शिक्षणादरम्यानच त्यांच्या शिक्षकांकडून याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. राज्याभिषेकाआधी सयाजीरावांना सर टी. माधवराव यांनी इतर शिक्षकांच्या साहाय्याने विविध विषयासंदर्भातील व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. २० जुलै १८८१ ला शिक्षण विषयावर देण्यात आलेल्या व्याख्यानात सयाजीरावांना “धर्मविषयक शिक्षण हे केवळ मानसिक पातळीवरील असावे. विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना कोणत्याही प्रकारच्या विशेष धार्मिक सूचना दिल्या जाऊ नयेत.” अशी सूचना करण्यात आली होती. दृष्ट काढण्यासंदर्भातील सयाजीरावांचा आदेश हा या सूचनेची अंमलबजावणीच आहे.

महाराजा सयाजीराव आणि स्वतंत्र धर्म खाते / १५