पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पतपुरवठा संस्था होत्या. या संस्थांमार्फत बडोदा संस्थानातील जनतेला प्रत्यक्ष पतपुरवठा केला जात नसे. मात्र कृषीविषयक इतर साधनांचा पुरवठा केला जात असे.

 १९१५-१६ मध्ये २९५ कृषी पतपुरवठा संस्थांपैकी १२२ कृषी पतपुरवठा संस्था बडोदा जिल्ह्यात होत्या. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बडोदा जिल्ह्यामध्ये ही संख्या सर्वाधिक होती. नवसारी जिल्ह्यात संस्थांची संख्या सर्वात कमी म्हणजे ४७ इतकी होती. १९३८-३९ मध्ये तालुका विकास संघटनांसह कृषी संस्थांची संख्या ९९६ पर्यंत वाढली. प्रत्येक वर्षी वाढत जाणारी कृषी संस्थांची संख्या बडोदा राज्यातील कृषी व्यवस्था बळकट करणारी होती. सभासद संख्येतदेखील बडोद्यातील कृषी संस्था अग्रेसर होत्या. १९३८-३९ साली कृषी संस्थांची सभासद संख्या ३०,५०० पर्यंत पोहोचली. बडोद्यातील कृषक समाज सहकार चळवळीने व्यापून गेल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. खेळत्या भांडवलातील वाढ सहकार चळवळीने बडोद्यातील शेतकऱ्याला इतर कोणत्याही संस्थानातील शेतकऱ्यांपेक्षा आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यास केलेली मदत अधोरेखित करते.

बडोदा संस्थानातील बिगर कृषी सहकार चळवळ

 सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानातील जी प्रजा शेती व शेतीपूरक व्यवसाय सोडून इतर व्यवसायात गुंतली आहे अशा लोकांना आर्थिक अडी-अडचणीवेळी आर्थिक साहाय्य करण्यासाठी बिगर कृषी पतपुरवठा संस्थांची निर्मिती केली.

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ११