पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोदा संस्थानात बँक ऑफ बडोदाने सर्वप्रथम धनादेशाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे बँकेतील बचत खात्यांना प्रोत्साहन देवून जनतेमध्ये बचतीची सवय रुजवण्याचा प्रयत्न केला.

 बडोदा सरकारकडून सातत्याने करण्यात आलेल्या आर्थिक मदतीच्या साहाय्याने बडोदा बँकेची प्रगती होत गेली. बँक ऑफ बडोदाने संस्थानातील परकीय व्यवसायांच्या नियमनात महत्त्वाची भूमिका बजावली. १९०८ मध्ये सयाजीरावांनी स्थापन केलेली ही भारतीय संस्थानातील पहिली सहकारी बँक आज ११२ वर्षानंतरही अत्यंत कार्यक्षमपणे कार्यरत आहे. समकालीन भारतातील 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या नंतरची दुसऱ्या क्रमांकाची बँक म्हणून ती नावारूपास आली आहे. बँक ऑफ बडोदाची सद्य:स्थिती सयाजीरावांच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीची साक्ष देते.

बडोदा संस्थानातील कृषी सहकार चळवळ

 महाराजा सयाजीरावांनी बडोदा संस्थानात विविध प्रकारच्या कृषी संस्था स्थापन केल्या. यामध्ये शेतकऱ्यांना पतपुरवठा करणाऱ्या व बिगर पतपुरवठा संस्थांचा समावेश होता. कृषी पतपुरवठा संस्थांमार्फत शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक कामांसाठी आवश्यक पतपुरवठा अल्प व्याजदरात केला जात असे. दूध पुरवठा संस्था, पाणीपुरवठा संस्था, पशुखाद्य साठवणूक संस्था, धान्य साठवणूक संस्था इ. संस्था या बिगर

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / १०