पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही दिवस ते जॉईंट सरसुभे झाले त्यावेळेस आंग्रे साहेब १३ महिने दिवाणाचे काम पाहत होते. तेव्हा त्यांच्या जागी भाऊसाहेबांनी सरसुभे म्हणून काम पाहिले. तेथून पुन्हा ते कडी प्रांताचे सुभे म्हणून काम पाहत होते. हे काम त्यांनी मार्च १८९८ पर्यंत केले आणि आंग्रे साहेब वारल्यामुळे त्यांना सरसुभेची जागा कायमची मिळाली. या सुमारास कडी प्रांतात पिलवाई प्रकरण घडून आले परंतु त्यांनी अत्यंत हुशारीने कसलीही मनुष्य हानी न होऊ देता ते मिटवले व बंडखोरांनाही योग्य ते शासन केले. तसेच कडी प्रांतातील विजापूर तालुक्यातील फर्ता आकडा गावात वसूल ठाकूर लोक मोजणी कामात अडथळा आणत होते. तेथील ठाकूर व बंडखोर रजपूत सरकारच्या विरुद्ध बंड करून सरकारी फौजेचा मोड करून विसनगर, विजयपूर इ. नगरे काबीज करायची व त्यांच्यातीलच एका इसमाला राजा करून दुसऱ्या एकाला प्रधान करायचे. परंतु भाऊसाहेबांनी महाराजांकडून प्रसंगी बंडखोरावर हल्ला चढवण्यासाठी सर्व ते अधिकार मिळवून घेतले आणि अत्यंत शिताफीने ठाकूर व रजपुतांचे बंड मोडून काढले तद्नंतर बंडखोरांना कडक शासन केले. या कामाबद्दल भाऊसाहेबांना महाराजांकडून चांगली शाबासकी मिळाली.
बडोद्याचे दिवाण : रामचंद्र विठोबा धामणस्कर

 सरसुभेच्या हुद्याचे काम भाऊसाहेबांनी तीन वर्षे केले एवढ्या अवकाशात त्यांना एकदा दिवाण पदावर काम करण्याची संधी मिळाली. पुढे दिवाण बहादुर श्रीनिवास राघव अंयगार हे

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर / २२