पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजारपणात सयाजीरावांनी फुलेंना आर्थिक मदत केली. या मदतीची नोंद फुलेंनी ' सार्वजनिक सत्यधर्म' ग्रंथाच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या अखंडा केली आहे. हा शेवटचा अखंड फुलेंनी त्यांच्या आजारपणातील उपचारासाठी ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक लिहिला आहे. फुलेंनी या अखंडाची सुरुवातच सयाजीरावांच्या उल्लेखाने केली आहे. फुलेंची सर्वात महत्वाची लेखनकृती असणाऱ्या या ग्रंथात सयाजीराव महाराजांचा उल्लेख फुले ‘सद्सदविचारसंपन्न’ असा करतात. यावरून फुल्यांच्या जीवनात सयाजीरावांचे स्थान किती महत्वाचे होते हे लक्षात येते.
 सयाजीरावांचे धारिष्ट्य
 १८८३ मध्ये प्रकाशित झालेल्या 'शेतकऱ्याचा असूड' या ग्रंथाच्या प्रकाशनाला सयाजीरावांनी आर्थिक मदत केली. हा ग्रंथ प्रकाशित होण्याअगोदर दोन वर्षे १८८१ मध्ये सयाजीरावांना राज्याधिकार प्राप्त झाले. विशेष बाब म्हणजे या ग्रंथाचे पहिले दोन भाग नारायण मेघाजी लोखंडे संपादित 'दीनबंधू' पत्रात क्रमशः प्रकाशित झाले होते. या ग्रंथात फुलेंनी भारतातील शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीसाठी ब्राह्मणी व्यवस्थेबरोबरच ब्रिटीश सरकारलादेखील जबाबदार ठरवले होते. ब्रिटीश सरकारचा रोष ओढवू नये म्हणून सत्यशोधक लोखंडेंनी क्रमशः प्रकाशन बंद केले. या पार्श्वभूमीवर दोन वर्षे आधी १८८१ मध्ये राज्यकारभार हाती घेतलेल्या सयाजीरावांनी ग्रंथाला उघडपणे अर्थसहाय्य करून इंग्रजांशी थेट भिडण्याची ही कृती अतिशय महत्वाची आहे. गेल्या ६० वर्षांत फुलेंच्या एकाही अभ्यासक-संशोधकाने या कृतीचे मोल लक्षात घेतले नाही.

 १९ ऑक्टोबर १८८२ रोजी हंटर कमिशनसमोर साक्ष देताना महात्मा फुलेंनी बहुजनांना शिक्षण देण्याची मागणी इंग्रज सरकारकडे केली होती. त्याच वर्षी सयाजीरावांनी अस्पृश्य- आदिवासींना मोफत शिक्षण, शैक्षणिक साहित्य आणि निवासाची सोय उपलब्ध करून देवून फुलेंच्या मागणीबरोबर कृतीचे पाऊल टाकले. त्याच वर्षी स्त्रीशिक्षिका तयार करण्यासाठी स्त्रियांचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरु करून सयाजीरावांनी शुद्रातिशुद्रांबरोबर स्त्रियांनादेखील उन्नतीचे महाद्वार खुले केले. पुढे १९०६ मध्ये भारतात सर्वप्रथम बडोदा संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा लागू करून सयाजीरावांनी फुलेंच्यापुढे एक पावूल

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / ८