पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सत्यशोधक विधिंसंबंधी मंगल अष्टकांसह सर्व पूजा विधींची छोटी पुस्तिका प्रकाशित केली होती. या पुस्तिकेच्या समारोपात फुले म्हणतात, “हल्लीं धर्मविधि करतांना नामधारी ब्राह्मण जे मंत्र किंवा मंगळाष्टकें म्हणतात, त्याचा संबंध प्रस्तुतचे विवाहास किंवा वेळासही नसून, त्या मंगळाष्टकांचा व मंत्रांचा काय अर्थ हेंही आमचे लोकांस समजत नसल्यामुळे केवळ आंधळ्यांचे व बहिऱ्यांचे बाजाराप्रमाणें होत आहे, म्हणून सत्यशोधक समाजाकडून विवाह व इतर कार्यासंबंधांचे धर्मविधि चालविण्यास कोणासही अडचण पडूं नये, म्हणून ते प्राकृत आणि सोपे असे तयार केले आहेत, यास्तव याचा लाभ सर्वांनीं घ्यावा अशी आमची विनंतीपूर्वक सूचना आहे.”
 फुलेंचा हा उपक्रम सयाजीरावांनी आपल्या कारकिर्दीत धर्मचिकित्सेच्या पुढे जावून धर्मसाक्षरतेचे महाअभियान राबवित धीरोदात्तपणे पुढे नेला. 'नितीविवाह चंद्रिका” (१८८७), ‘वधूपरीक्षा' (१९०३), 'लग्नविधी व सोहळे' (१९०४), ‘विवाह विधीसार’ (१९१३), 'उपनयन विधीसार' (१९१६), ‘श्राद्ध-विधीसार’, ‘अंत्येष्ठिविधिसार”, ‘दत्तकचंद्रिका', 'दानचंद्रिका' इ. ग्रंथ प्रकाशित करून फुलेंनी सुरू केलेली धर्मचिकित्सा सयाजीरावांनी धर्मसाक्षरता अभियानाद्वारे सकारात्मक, उत्क्रांत आणि परिपूर्ण केली. १८८६ मध्ये ऐनेराजमेहेल हा राजवाड्यातील वार्षिक धार्मिक विधींची शास्त्रोक्त माहिती देणारा विस्तृत ग्रंथ महाराजांनी तयार करून घेतला होता. धार्मिक खर्चावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने १८९२ मध्ये राजवाड्याच्या देवघरातील धार्मिक विधींच्या खर्चाचे १००० पानांचे तपशीलवार बजेट छापून घेतले.

 १८९६ मध्ये बडोद्यात घडलेल्या वेदोक्त प्रकरणानंतर सयाजीरावांनी सर्व वेदोक्त विधींच्या संदर्भातील १६ संस्कारांच्या विधींचे मराठी भाषांतर करून छापण्याचे काम रियासतकार सरदेसाईंकडून करून घेतले. १९०५ मध्ये बडोद्यात लागू केलेल्या हिंदू विवाह कायद्यात १९२८ साली 'सुधारणा केली. त्यानुसार लग्नविषयक सर्व वैदिक मंत्रांचे मराठी, गुजराती व हिंदी या भाषांमध्ये भाषांतर करून ते सरकारमार्फत प्रसिद्ध करण्यात यावे व ते भाषांतर वधू-वरांच्या मातृ भाषेत लग्न लावणाऱ्या पुरोहिताने वाचून समजावून सांगावे व तसे न केल्यास त्याला ५० रु. दंड करण्याची तरतूद केली. ही दंडाची रक्कम आजच्या रुपयाच्या मुल्यात १ लाख ३० हजार रु.हून अधिक भरते. फुलेंना अपेक्षित असलेली बहुजनांची धार्मिक

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / २८