पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाऊरावांना पाहिले. तेव्हा भाऊरावांना सन्मानाने मंडपात आणण्यासाठी त्यांनी राजरत्न आर. एस. माने-पाटील यांना पाठवले. माने-पाटलांसोबत सन्मानाने आत जाऊन भाऊरावांनी सयाजीरावांना मानपत्र अर्पण केले.
 सयाजीरावांनी १९३७ मध्ये युरोपच्या दौऱ्यावरून परतल्यावर मुंबई येथे सयाजीराव आणि भाऊराव यांची भेट झाली. या भेटीत भाऊरावांनी स्वावलंबी तत्वावर शाळा व वसतिगृह सुरू करून मोफत शिक्षणाची सोय करण्याची कल्पना मांडली. या कल्पनेनुसार मुलांनी रोज २ तास शारीरिक श्रम करून त्याबदल्यात माध्यमिक शिक्षण मोफत घ्यावे अशी ती योजना होती. महाराजांना ही योजना आवडली. सयाजीरावांनी ही शाळा व संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने ४,००० रु. ची मदत दिली. या मदतीतून जमनाबाई गायकवाड शिष्यवृत्ती सुरू झाली.
 ‘महाराजा सयाजीराव फ्री अँड रेसिडेन्शिअल हायस्कूल'
 रयत शिक्षण संस्थेचा आत्मा असणाऱ्या 'कमवा आणि शिका' योजनेचा आरंभ या शाळेच्या स्थापनेबरोबरच झाला. ३ डिसेंबर १९३९ रोजी भाऊरावांनी साताऱ्यात ‘महाराजा सयाजीराव फ्री अँड रेसिडेन्शिअल हायस्कूल' या निवासी माध्यमिक विद्यालय आणि ट्रेनिंग कॉलेजच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ सयाजीरावांचे नातू आणि उत्तराधिकारी प्रतापसिंह यांच्या हस्ते केला. भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेचे 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' ब्रीदवाक्य असणारे हे पहिले निवासी माध्यमिक विद्यालय २० जून १९४० रोजी सुरू झाले. सयाजीरावांनी केलेल्या अस्पृश्योद्धार आणि शैक्षणिक कामाचे स्मारक म्हणून भाऊरावांनी या माध्यमिक विद्यालयाला ‘महाराजा सयाजीराव फ्री अँड रेसिडेन्शिअल हायस्कूल' असे नाव दिले.

 सयाजीरावांनी १८८२ मध्ये सोनगढ येथे सुरू केलेल्या आदिवासी वसतिगृहास १९०० मध्ये ३० एकर जमीन कसण्यासाठी दिली होती. या जमिनीतून भाजीपाला पिकवून वसतिगृहाचे विद्यार्थी तो विकत असत. थोडक्यात संस्थानी खर्चाने मोफत शिक्षण, राहण्या-खाण्याची सोय केल्यानंतरही विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी सयाजीरावांनी भारतात सर्वप्रथम 'कमवा व शिका' योजनेची सुरुवात केली. याच योजनेशी नाते सांगणारी योजना कर्मवीरांनी पुढे ४० वर्षांनी

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / २४