पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीरावांच्या नावाने सुरू केलेल्या माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून १९४० मध्ये महाराष्ट्रात राबविली.
 सयाजीरावांचा प्रभाव
 भाऊरावांच्या वसतीगृह चळवळीची प्रेरणा शाहू महाराज होते त्यामुळेच भाऊरावांनी काढलेले पहिले हॉस्टेल शाहू महाराजांच्या नावाने होते. सयाजीरावांनी बडोद्यात सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा क्रांतिकारक उपक्रम १९३७ पर्यंत पूर्णत्वास नेला होता. भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यांची प्रेरणा सयाजीराव असल्यामुळे पहिल्या हायस्कूलला त्यांनी सयाजीरावांचे नाव दिले. कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाची प्रेरणा सयाजीराव होते याचा आणखी एक पुरावा म्हणजे १० ऑक्टोबर १९४० रोजी भाऊरावांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आर. पी. मसाणी यांच्या हस्ते 'सौ. लक्ष्मीबाई पाटील फिरते वाचनालय व ग्रंथालय' सुरू केले. या फिरत्या वाचनालयाचीही प्रेरणा सयाजीरावांनी १९१० मध्ये ‘सयाजीवैभव” या नावाने बडोद्यात सुरू केलेला फिरत्या ग्रंथालयाचा उपक्रम होता.

 शुद्रातिशुद्रांच्या गुलामगिरीचा अंत करण्यासाठी फुल्यांनी ज्ञानाचे जे शस्त्र शोधून काढले होते त्याचा ‘महाप्रयोग' सयाजीरावांनी बडोद्यात केला. या प्रयोगाची ऊर्जा इतकी जबरदस्त होती की तिने महाराष्ट्राचा आसमंत कायमचा 'प्रकाशमान केला. अर्थात कर्मवीरांची आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था हे तिचे सर्वात दैदीप्यमान यश होते. कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच सयाजीरावांच्या कामाचा त्यांच्या शैक्षणिक कार्यातील प्रभाव नि:संदिग्धपणे सांगताना म्हणतात, “१९०६ साली मी आपले अंत्यजोद्धारासंबंधी भाषण वाचले व त्या भाषणाने माझ्या मनामध्ये अतिशय खळबळ उडवून दिली. मी तेव्हाच निश्चय केला की, श्रीमंत महाराजांनी दर्शविलेल्या विचाराप्रमाणे व व्यक्त केलेल्या ध्येयास अनुसरून आजन्म प्रयत्न करावयाचा. उपजीविकेस साधन म्हणून नोकरी करून जे काही पैसे शिल्लक राहतील ते हीन मानलेल्या लोकांस ज्ञान देऊन त्यांना पुढे आणण्यामध्ये खर्च करावयाचे. या हेतूने मी काही दिवस नोकरीही केली; परंतु त्या व्यवसायामुळे माझे ध्येय बरोबर मला गाठता येईना, म्हणून नोकरीवरही मी तिलांजली दिली व प्रस्तुतचे कार्य अंगावर घेतले.”

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / २५