पान:महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कल्याणाचे काम केले. या उदाहरणावरून गंगारामभाऊंचे काम किती मुलभूत होते हे स्पष्ट व्हावे.
 सयाजीराव गायकवाड यांचे या संस्थेला स्थापनेपासूनच सर्वाधिक आर्थिक सहाय्य होते. या संस्थेची स्थापना करण्याचे निश्चित झाल्याबरोबर गंगारामभाऊंनी आर्थिक सहाय्यासाठी सयाजीरावांची मदत घेण्याचे ठरवले. १८८१ ला महाराजांनी राज्यकारभार हाती घेतला. पुढे लगेचच १८८५ ला म्हस्केंनी आर्थिक मदतीसाठी सयाजीरावांची भेट घेतली. यासंदर्भात सीताराम तारकुंडे म्हणतात, 'श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची स्वारी पुणे मुक्कामी आली होती. श्रीमंताकडे रा.ब. महादेव गोविंद रानडे, रा. रा. गंगाराम म्हस्के, वकील रा. रा.राजन्ना लिंगू व आणखी दोन तीन सभ्य गृहस्थ यांचे डेप्युटेशन गेले. रा. ब. रानड्यांनी गायकवाड सरकारास डेप्युटेशचा उद्देश सांगितला. डेप्युटेशनचा उद्देश हा होता की, मराठे लोकांची, त्यांस विद्या नसल्यामुळे किती शोचनीय स्थिती झाली आहे हे श्रीमंतास विदित आहेच. तरी मराठ्यांच्या गरीब व होतकरु मुलांस हायस्कुलचे शिक्षण मिळण्याकरिता त्यांस स्कॉलरशिप दिल्या पाहिजेत. या कामाकरिता आम्ही एक फंड काढला आहे, त्यास श्रीमंतांनी हातभार लावावा.'
 बडोद्याचे दिवाण : सत्यशोधक धामणस्कर

 १८८४ मध्ये सयाजीराव महाराजांना बडोद्याचे दिवाण काजी शहाबुद्दीन यांच्याकरवी अण्णा भिवराव व मामा परमानंद यांनी धामणस्करांचे नाव सुचवले. त्यानंतरभाऊसाहेबांना १८८४ मध्ये बडोदे सरकारातून बोलावणे आले व सयाजीराव महाराजांनी त्यांची मुलाखत घेऊन दरमहा ४५० रु. पगार देऊन बडोद्यामध्ये नोकरीत रुजू केले. बडोदा संस्थानात प्रथमतः १८८४ मध्ये भाऊसाहेबांची नियुक्ती असिस्टंट सरसुभे या पदावर झाली. १८८६ मध्ये त्यांना अमरेली प्रांताचे सुभेदार नेमले. त्यांनी अवघे १० महिने अमरेली प्रांतात काम केले. महाराजांचा ३१ मे १८८७ ते २० फेब्रुवारी १८८८ असा ८ महिने २० दिवसांचा पहिला परदेश प्रवास होता. यावेळी महाराज इंग्लंड दौऱ्यावर गेले होते. या प्रवासावेळी मुख्याधिकारी म्हणून रामचंद्र धामणस्कर यांची महाराजांनी निवड केली होती. या दौऱ्याचे मुख्याधिकारी म्हणून धामणस्कर यांनी बजावलेल्या उत्तम कामगिरीवर खुश होऊन महाराजांनी त्यांना १५० रु. मासिक पगारवाढ दिली.

महाराजा सयाजीराव आणि सत्यशोधक चळवळ / १६