चिमणाबाईंनी १९११ मध्ये भारतीय स्त्रियांच्या स्थितीची जगातील ७ खंडातील २९ देशांमधील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना करणारा 'The Position of Women in Indian Life' हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ भारतीय स्त्रियांना अर्पण केला असून तो लंडनमधून प्रकाशित झाला होता. या ग्रंथाचे लेखन चिमणाबाईंनी एस. एम. मित्रा यांच्या सहकार्याने केले होते. स्त्रियांना आत्मसन्मानासह सक्रिय सामाजिक सहभागासाठी काय करायला हवे याचा जागतिक परिप्रेक्ष्यात विचार करणारा जगातील हा एकमेव ग्रंथ आहे. तर जगातील स्त्रियांच्या स्थितीशी भारतीय स्त्रियांच्या स्थितीची तुलना करून लिहिलेला हा आजखेरचा एकमेव ग्रंथ आहे. लंडन मधील फरगॉटन बुक्सने या पुस्तकाची १९१२ ला दुसरी आवृत्ती काढली आहे. फरगॉटन बुक्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते जगातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ ग्रंथांचे कोणताही बदल न करता पुनर्मुद्रण करते. चिमणाबाईंच्या या पुस्तकाला फरगॉटन बुक्सने classical reprint series मध्ये निवडले आहे. यावरून या पुस्तकाचा ऐतिहासिक दर्जा लक्षात येतो.
सयाजीराव आणि सत्यशोधक गंगारामभाऊ म्हस्के
गंगारामभाऊ म्हस्के हा आधुनिक महाराष्ट्रातील पूर्णतः अज्ञात महानायक आहे. गंगारामभाऊ हे सत्यशोधक समाजाचे हितचिंतक होते. फुलेंनी ग्यानोबा कृष्णाजी ससाणे आणि काशीबाई नारायण शिंदे यांचा जो सत्यशोधक विवाह घडवून आणला त्या विवाहात सनातनी मंडळींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बंदोबस्ताचे काम गंगारामभाऊ म्हस्केंनी केले. १८७६ मध्ये सत्यशोधक समाजाच्या कामाला सहकार्य म्हणून २२ रुपये वर्गणी म्हस्केंनी दिली होती. २४ सप्टेंबर १८७६ ला सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या वार्षिक बैठकीत शुद्र विद्यार्थांसाठी वसतिगृह स्थापन झालेल्या समितीत महात्मा फुलेंबरोबर गंगारामभाऊ म्हस्केंचाही समावेश होता. पुढे फुलेंचे आणि गंगारामभाऊंचे संबंध जरी बिघडले तरी महात्मा फुलेंच्या शिक्षण धोरणाचा पुरस्कार त्यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन स्थापन करून केला.
म्हस्केंनी पुण्यामध्ये मराठा जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने १८८३ मध्ये डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था स्थापन केली. मराठ्यांच्या शैक्षणिक उन्नतीचा विकास तपासला असता