पान:महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संशोधनातील महाराजा सयाजीरावांचे योगदान जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण या संशोधनासाठी सयाजीराव महाराजांनी केतकरांना आर्थिक साहाय्य केले होते.
अस्पृश्योद्धारक सयाजीराव

 १९०९ मध्ये ‘द इंडियन रिव्ह्यू' या इंग्रजी मासिकात प्रकाशित झालेल्या 'द डिप्रेस्ड क्लासेस' या निबंधात ' जातीचा प्रश्न सोडवला नाही तर ती भारतासाठी 'राष्ट्रीय आत्महत्या' असेल' असा इशारा देणाऱ्या सयाजीरावांनी 'कृती आणि प्रबोधना'च्या संतुलित समन्वयातून जात साक्षरतेचा 'महाप्रयोग' आपल्या संस्थानात राबवला. १८७७ मध्ये अहमदाबाद येथे अस्पृश्यांसोबत सहभोजन करत या महाप्रयोगाची सुरुवात केली. १८८३ मध्ये महाराजांनी स्वतःच्या राजवाड्यातील खंडोबाचे खाजगी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. १८८६ साली राजवाड्यातील अस्पृश्यांसाठी वेगळ्या जेवणाच्या पंगतीची पद्धत स्वतः त्या पंगतीत बसून मोडली. १५ ऑक्टोबर १८९६ रोजीच्या आदेशानुसार विजयादशमीपासून राजवाड्यातील सर्व धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने करणे बंधनकारक केले. तर २३ जानेवारी १९१० रोजी सयाजीरावांनी बडोद्यातील सर्व अस्पृश्य विद्यार्थ्यांना राजवाड्यात मोठी मेजवानी दिली. स्वतः च्या कृतीतून जनतेसमोर जात निर्मूलनाचा आदर्श ठेवतानाच सयाजीरावांनी आपल्या संस्थानातील जनतेची जात साक्षरता वाढवण्यावर जाणीवपूर्वक भर दिला.

महाराजा सयाजीराव आणि श्रीधर व्यंकटेश केतकर / ७