पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी सांगितलेच आहेत. ...म्हणून लोकल बोर्डाच्या मंडळींना माझे आग्रहपूर्वक सांगणे आहे की, तुम्ही या शेतकऱ्यांकरिता काढलेल्या संस्था, पेढ्यांच्या कारभारात अगत्यपूर्वक लक्ष घाला व ते कारभार यशस्वी होण्यास तुम्ही जातीनिशी व तुमच्या बोर्डामार्फत प्रयत्नांची शिकस्त करा.”
 जमिनीच्या तुकडीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते. या पार्श्वभूमीवर शेतीच्या एकत्रीकरणातून उत्पादकता वाढवून त्याचा शेतकऱ्याला फायदा व्हावा या हेतूने १९२७ मध्ये पाच विखुरलेल्या शेतजमिनीचे एकत्रीकरण करणाऱ्या सहकारी संस्थांची निर्मिती सयाजीरावांनी केली. शेतमालाच्या अधिकच्या उत्पादनाबरोबरच शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने १९३८-३९ अखेर विखुरलेल्या शेतजमिनींचे एकत्रीकरण करणाऱ्या ७७ संस्थांची बडोद्यात कार्यरत होत्या. आज शेतीच्या तुकडीकरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याची स्थिती लक्षात घेता सयाजीरावांच्या शेतजमिनी एकत्रीकरणासाठीच्या प्रयत्नांचे क्रांतिकारकत्व स्पष्ट होते.
 १९१४ मध्ये बडोदा येथील सहकारी मंडळ्यांच्या परिषदेत केलेल्या भाषणामध्येच शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करताना सयाजीराव म्हणतात, "शेतीसाठी किंवा घर कामासाठी लागणारे जिन्नस त्याला

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ३७