पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हैसाना जिल्ह्यातील आनंद हे ठिकाण बडोदे संस्थानातच येते. १९२७-२८ मध्ये पाद्रा तालुक्यातील गावांमध्ये दुग्ध व्यवसाय सुरू करण्याच्या हेतूने सयाजीरावांनी 'विशेष आर्थिक चौकशी समिती नेमली. या समितीच्या अहवालानुसार बडोद्यात २७ दुभत्या जनावरांसाठीच्या संस्थांची स्थापना करण्यात आली. याचबरोबर सयाजीरावांनी बडोद्यात पशुसंवर्धन आणि शुद्ध दूध पुरवठ्यासाठी सहकारी संस्थांची स्थापना केली. १९३०-३१ मध्ये बडोद्यात १३ दुभत्या जनावरांच्या संस्था, ४ दूध पुरवठा संस्था आणि ३ पशुसंवर्धन संस्था कार्यरत होत्या.
 शेती आणि सहकार यांच्या समन्वयातूनच शेतीचा उत्कर्ष होऊ शकतो हे ओळखणारे आणि तो प्रयोग यशस्वी करणारे सयाजीराव हे भारतातील पहिले प्रशासक आहेत. या समन्वयाबद्दलची त्यांची भूमिका महाराजांनी पुढीलप्रमाणे व्यक्त केली आहे. सहकार चळवळ व शास्त्रीय शेतीसंदर्भातील समन्वयाबद्दल बोलताना सयाजीराव महाराज म्हणतात, “शेती व सहकार यांची उन्नती हे प्रत्येक जिल्ह्याच्या लोकल बोर्डाचे कर्तव्य आहे. परंतु हे कर्तव्य क्वचितच योग्य रीतीने पाळण्यात येते. अशा महत्त्वाच्या कामाची इतकी उपेक्षा का व्हावी ते मला कळत नाही. ...प्रस्तुत संमेलनाने या मंडळीची खात्री होईलच की सहकारी चळवळ व शास्त्रीय पद्धतीची शेती हे विषय खरोखर मोठे महत्त्वाचेच आहेत. या चळवळीचे काही आर्थिक फायदे

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ३६