पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घाऊक भावाने मिळवून देणे, शेतीसंबंधीचे नवे नवे शास्त्रीय प्रयोग त्याला माहिती व प्राप्त करून देणे, विमा पद्धतीने त्यांच्या धंद्याला स्थैर्य आणून देणे वगैरे आर्थिक फायदे सहकारी चळवळीमुळेच शेतकऱ्यांना होतात.” सहकार चळवळीचे हे सर्व फायदे बडोद्यातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सयाजीराव आयुष्यभर प्रयत्न करत राहिले.
 पिकांना किमान हमीभाव मिळावा यासाठी देशभरात होणारी शेतकऱ्यांची दरवर्षी होणारी आंदोलने आपण पाहतो. भुईमुगासारख्या पिकाला योग्य भाव मिळावा या हेतूने सयाजीरावांनी १९३७ मध्ये सहकारी तत्त्वावर भुईमूग खरेदी- विक्री संस्थेची स्थापना केली. भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागू नये हा या संस्थेच्या स्थापनेमागचा मुख्य हेतू होता. पहिल्याच वर्षी या संस्थेने शेतकऱ्यांकडून एकूण ३५२८ मण भुईमुगाची खरेदी केली. शेतकऱ्याच्या उत्पादनाला किमान हमी भाव मिळावा यासाठी सहकारी संस्थेची स्थापना करण्यामागील सयाजीरावांची 'तळमळ' आजच्या शासनकर्त्यांनी शिकण्यासारखी आहे.

भारतीय संदर्भात बडोद्यातील कृषी सहकाराचे वेगळेपण
 सयाजीरावांनी बडोद्यात उभ्या केलेल्या सहकार चळवळीचे 'अनन्यत्व' समजून घेण्यासाठी तिची तत्कालीन भारतात प्रगतिशील समजल्या जाणाऱ्या मुंबई आणि म्हैसूर प्रांत आणि त्रावणकोर संस्थानातील सहकार चळवळीशी तुलना

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ३८