पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्यात नोकरी करावी अथवा स्कॉलरशिपची रक्कम परत करावी अशी अट त्यांना घालण्यात आली. सयाजीरावांनी ही स्कॉलरशिप दिल्यानंतर डेक्कन मराठा असोसिएशनकडून शिंदेंना दिली जाणारी १० रु. ची मदत बंद करण्यात आली. सयाजीरावांनी विठ्ठल रामजी शिंदेंना पदवी आणि एल. एल. बी. शिक्षणासाठी ५ वर्षे एकूण सुमारे १,५०० रु.ची मदत केली.
ऑक्सफर्ड येथील तुलनात्मक धर्म शिक्षणाला आर्थिक
साहाय्य

 सयाजीरावांनी शिंदेंना ऑक्सफर्ड येथील तुलनात्मक धर्म अभ्यासासाठी जाण्यासाठी आणखी मदतीची आवश्यकता होती. त्यासाठी शिंदे महाराजांच्या भेटीला गेले. यासंदर्भात शिंदे म्हणतात, '... मी बडोद्यास महाराजांकडे गेलो. भेट झाली. महाराज खरे दिलदार, ते हसून म्हणाले “काय शिंदे, आमच्या पैशांची काय वाट?" मी अत्यंत नम्रपणाने उत्तर केले, “महाराज, पत्करलेले कार्य ईश्वराचे आहे आणि ते आपल्यास पसंत पडण्यासारखेच आहे. धर्मसुधारणा, समाजसुधारणा इत्यादी प्रागतिक गोष्टीच बाळकडू आपण आजपर्यंत 'पुष्कळच पाजीत आलेले आहात. आता तर विलायतेतील युनिटेरियन समाजाने माझा अर्ज पसंत केल्यावर ही चालून आलेली संधी आपण दवडणार नाही अशा भरवशावरच आपणांकडे आलो. मला प्रवासास लागणारे सुमारे दीड हजार रुपये जर आपण कृपाळूपणे द्याल तर अर्थातच माझे दीड हजार रुपयांचे ऋण फिटले

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / ९