पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजाने अस्पृश्यांसाठीच्या कार्यासाठी सयाजीरावांना 'पतितपावन' ही पदवी दिली. ९ फेब्रुवारी १९३३ रोजी बडोदा येथे म्युनिसिपॅलिटीतर्फे देण्यात आलेल्या मानपत्र समारंभात सयाजीरावांनी अस्पृश्यतेची उत्पत्ती आणि तिचे स्वरूप यावर भाषण केले. १९३७ मध्ये लंडनमधून प्रकाशित झालेल्या आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने सयाजीराव महाराजांच्या हयातीत प्रकाशित केलेल्या चरित्र ग्रंथाचे लेखक स्टेनले राईस यांच्या 'हिंदू कस्टम्स अॅण्ड देअर ओरिजीन्स' या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सयाजीरावांनी अस्पृश्यतेला आपल्या प्रगतीच्या इतिहासावरील डाग' म्हटले आहे. राईस यांनी हा ग्रंथ महाराजांना अर्पण केला आहे. आपल्या कारकीर्दीत सयाजीरावांनी केलेल्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला हा ‘अनोखा’ सन्मान होता. अस्पृश्योद्धारासाठी राबणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांप्रमाणेच विठ्ठल रामजी शिंदे यांच्या एकूण सार्वजनिक जीवनात सयाजीरावांनी केलेली 'पाठराखण' ही वटवृक्षाच्या 'आश्वासक' सावलीसारखी होती. सयाजीरावांचे स्वत:च्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करताना विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, “मी महाराजांकडून उपकृत झालेला मनुष्य आहे. आजकाल भरत खंडात अस्पृश्यता निवारणार्थ चळवळ देशभर फोफावली आहे, तिची पाळंमुळं आणि धुरा महाराजांच्याच खांद्यावर आहे. अस्पृश्य उद्धाराची हिंदुस्थानातील मुहूर्तमेढ ह्या खंबीर पुरुषाने धडक्यासरशी जी रोवली तिचा पुढे विस्तार

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / २४