Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अस्पृश्योद्धार- सयाजीरावांना अग्रक्रम
 श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या मराठी ज्ञानकोशासाठी १९२३ मध्ये लिहिलेली 'अस्पृश्यता निवारणाचा भारतीय इतिहास' नोंद हे विठ्ठल रामजी शिंदेंचे अत्यंत महत्त्वाचे लेखन आहे. या नोंदीत त्यांनी संपूर्ण भारतातील अस्पृश्यांच्या खानेसुमारीचा आधार घेऊन आधुनिक काळातील अस्पृश्यता उद्धाराची पूर्वपीठिका वस्तुनिष्ठपणे मांडली आहे. या नोंदीत भारतातील अस्पृश्योद्धाराच्या कामाचा इतिहास सांगताना शिंदेंनी महात्मा फुले, शशिपाद बंडोपाध्याय यांच्यानंतर तिसरा क्रमांक महाराजा सयाजीराव गायकवाड यांना दिला होता. हा क्रमांक कालानुक्रमे होता. ही दखल घेत असताना सयाजीरावांच्या कार्याच्या परिणामकारकतेबाबत शिंदे म्हणतात, 'कार्याच्या प्रमाणाच्या व सिद्धाच्या दृष्टीने पाहताना वरील दोघांपेक्षा महाराजांचे काम इतके विस्तीर्ण व परिणामकारक झाले आहे की, या तिघांच्या कार्याची तुलना करणेच व्यर्थ आहे.' भारतातील अस्पृश्यता निवारणविषयक कार्याला सयाजीरावांनी वेळोवेळी केलेल्या मदतीविषयी शिंदे 'कृतज्ञ' होते. सयाजीरावांनी स्वत:च्या संस्थानात अस्पृश्यता निवारणासाठी केलेले प्रयत्न आणि भारतभरातील व्यक्ती आणि संस्थांना केलेले साहाय्य यांचे महत्त्व विठ्ठल रामजी शिंदेंनी आपल्या नोंदीत अचूकरीत्या अधोरेखित केले आहे. सयाजीरावांच्या अस्पृश्यता निवारण कार्याच्या गौरवार्थ १९२१ मध्ये परोपकारी सभा व आर्य

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / २३