पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ अशा एकूण ४ शिष्यवृत्त्या सुरू केल्या. या शिष्यवृत्त्यांमुळेच फर्ग्युसन कॉलेज पाली भाषा सुरू करू शकले. महाराष्ट्रातील बौद्ध धर्म आणि पाली भाषा प्रसाराचा हा इतिहास आज आपण समजून घेणे 'आवश्यक आहे.
श्रीमंत सयाजीराव गायकवाड पुरस्कार
 संस्थानातील जनतेचे विविध विषयांचे आकलन परिपूर्ण व्हावे या उद्देशाने ग्रंथ निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या सयाजीरावांनी अनेक लेखकांना राजाश्रय दिला. बडोद्यातील 'श्रीमंत सयाजीराव गायकवाड पारितोषिक समिती'च्या वतीने नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर भारतातील लेखक आणि समाजसेवकांना पुरस्कार दिला जात होता. या पुरस्काराच्या मानकऱ्यांनी बडोद्यात एक आठवडा येऊन संस्थानचे पाहुणे म्हणून राहावे आणि एक-दोन व्याख्याने द्यावीत असा नियम होता. १९३२-३३ साली १,०००रु. रोख रकमेचा हा पुरस्कार विठ्ठल रामजी शिंदेंना देण्यात आला. याच वर्षी एक वर्षासाठीची तैनात म्हणून दरमहा १०० रु. असे वार्षिक १,२०० रु. व पुरस्काराचे १,००० रु. असे एकूण २,२०० रु. महर्षी शिंदेंना यावेळी मिळाले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ४७ लाख ५८ हजार २६९ रु. इतकी भरते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी बडोद्यास गेल्यानंतर शिंदेंनी 'अस्पृश्यतेचा प्रश्न' आणि 'समाजसुधारणा' या विषयांवर ३ व्याख्याने दिली. यातील १८ जानेवारी १९३३ रोजी बडोदा कॉलेजच्या हॉलमध्ये झालेल्या पहिल्या व्याख्यानाला सयाजीराव उपस्थित होते.

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / २०