पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विठ्ठल रामजी शिंदे यांचे जातधर्मविषयक संशोधन आणि अस्पृश्यता निवारणासाठीच्या सामाजिक पातळीवरील संस्थात्मक कार्याचा विचार करता २५ ते २७ डिसेंबर १९३४ दरम्यान बडोद्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र या सत्राचे अध्यक्ष म्हणून त्यांची झालेली निवड सार्थ ठरते.
शिंदे आणि मंदिर प्रवेश
 २० व्या शतकाच्या पूर्वार्धात झालेली पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वाखालील अमरावती येथील अंबाबाई मंदिर (१९२७) व डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील पर्वती टेकडी (१९२९) आणि काळाराम मंदिर (१९३०) प्रवेशासाठीची आंदोलने महाराष्ट्रभर गाजली. परंतु १९२४ मध्ये त्रावणकोर संस्थानातील व्हायकोम येथे विठ्ठल रामजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाबाबत पुरोगामी महाराष्ट्र ' अज्ञानी' राहिला. याउलट महाराजा सयाजीरावांनी १८८३ मध्येच आपले खासगी खंडेरायाचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले होते. १९२५ मध्ये सयाजीरावांनी अमरेली येथील सार्वजनिक मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. तर १९३२ मध्ये महाराजांनी कोणत्याही आंदोलनाशिवाय बडोदा संस्थानातील सर्व सरकारी मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. मंदिर 'प्रवेशा'चा हा अज्ञात इतिहा आजच्या समाजाने समजून घेतला तर अस्पृश्यता निर्मूलन चळवळीविषयीचे आकलन अधिक परिपूर्ण होण्यास मदत

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / २१