पान:महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परंतु काही कारणाने ही योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. यामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी जाणीवपूर्वक मनुष्यबळ तयार करण्याचा महाराजांचा उद्देश होता. महर्षी शिंद्यांप्रमाणेच श्रीधर व्यंकटेश केतकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांनाही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बडोद्यात नोकरी न करण्याचा पर्याय स्वीकारण्याबरोबरच त्यांच्यावर झालेला शिक्षणाचा खर्च माफ करण्याचा उदारपणा महाराजांनी दाखवला होता हे विसरता येणार नाही.
शिंदेंची बडोदा भेट
 विठ्ठल रामजी शिंदे परदेशाहून परत येण्याआधी सयाजीरावांनी त्यांना पत्राद्वारे भारतात आल्यानंतर सर्वप्रथम आपली भेट घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे भारतात आल्यानंतर ऑक्टोबर १९०३ मध्ये शिंदेंनी बडोद्यात सयाजीरावांची भेट घेतली. सयाजीरावांनी त्यांना बडोद्यातील अस्पृश्यांसाठीच्या शाळांची तपासणी करून सूचना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विठ्ठल रामजी शिंदेंनी या शाळांची तपासणी करून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी पारंपरिक उद्योगधंदे करण्यास नाखूश असल्याने त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची सूचना मांडली. या सूचनेवरील सयाजीरावांची प्रतिक्रिया सांगताना शिंदे म्हणतात, “धोरणी महाराजांनी लोकमत अनुकूल नसल्याने तूर्त हे शक्य नाही असे सांगितले; पण स्कॉलर्शिपा देऊन पुढील शिक्षणाची सोय करण्याचे कबूल केले आणि त्याप्रमाणे तशी व्यवस्था पण

महाराजा सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे / ११