Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 टी. माधवरावांच्या विनंतीस मान देऊन २८ डिसेंबर १८८१ ला राजा रवी वर्मा राज वर्मासह बडोद्याला गेले.कुमारावस्थेतील सयाजीराव महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात जल्लोशात पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक राजे आमंत्रित केले होते. दरबारात सर्व राजे आणि मानकरी जमा झाले होते. सर रिचर्ड मीड रेसिडेंटसाहेबांनी सयाजीराव महाराजांना मखमली सिंहासनावर नेऊन बसवले आणि सयाजीराव महाराज अधिकृतरीत्या राजे झाल्याची घोषणा केली. तोफांची सलामी झाली आणि बडोद्यात एकच आनंदोत्सव झाला. त्यावेळी महाराज १८ वर्षांचे तर राजा रवी वर्मा ३३ वर्षांचे होते. तो सोहळा पाहून राजा रवी वर्मानी महाराजांचा आणि टी. माधवरावांचा निरोप घेतला. ते मुंबईला परत यायला निघाले. बडोदा स्टेशनवर त्यांना निरोप द्यायला टी. माधवराव स्वतः आले होते. त्यावेळेस राजा रवी वर्मा म्हणाले, "वयानं लहान आणि अजाण असले तरी सयाजीराव महाराजांपुढं नतमस्तक होताना जो निर्भेळ आनंद मला लाभला, तो इतर राजांपुढे लाभेल की नाही याची मला दाट शंका आहे.” बडोद्याहून राजा रवी वर्मा एक वेगळाच अनुभव घेऊन आले होते. ते सर्वांना सांगत होते की, “तो कुमार राजा, पण त्याचं तेज वय विसरायला लावतं. आयुष्यात एक अनमोल स्नेहबंध घेऊन आल्याचा आनंद मी उपभोगत आहे. "

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / २१