पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरू केलेल्या 'वंदेमातरम' या लेखातूनही खळबळजनक लेख लिहीत. अरविंद घोष यांना एवढे दिवस सुटी कशी काय मिळते याबाबत इंग्रज अधिकारी महाराजांकडे विचारणा करत; परंतु महाराज ही बाब माझ्या अखत्यारीत येत नाही हे सांगून मोकळे होत. थोडक्यात, काय तर महाराजांचा अरविंद घोषांना पूर्ण पाठिंबा होता. मागे म्हटल्याप्रमाणे त्यांचे बडोद्यातील वास्तव्याच अनेक अर्थाने महान होते. त्यामुळे बडोदा राज्यात त्यांना विशेष सवलती मिळत होत्या.
 अरविंद घोष यांनी बडोदा राज्यातील मेहसाणा या ठिकाणी असणाऱ्या 'शिक्षक' छापखान्यातून काही लेखांचे भाषांतर केल्याचा संशय इंग्रजांना होता. तसेच 'मुक्ती कोन पथे' या पुस्तकाचे गुजरातीत भाषांतर केल्याचाही आरोप त्यांच्यावर होता; परंतु सयाजीराव महाराजांच्या गनिमीकाव्याने हे आरोप इंग्रजांना सिद्ध करता आले नाहीत. महाराजांचा अरविंद घोष यांना पूर्ण पाठिंबा आणि राजाश्रय होता. त्यामुळे इंग्रजांच्या कोणत्याही आरोपाला महाराज परस्पर उत्तर देऊन प्रकरण मिटवत असत.
 अरविंद घोषांना प्राथमिक शिक्षणापासूनच व्यायामाची आवड होती. इंग्लंडमध्ये असताना देखील ते नियमितपणे व्यायाम करत होते. क्रांतिकारी संघटनामधून कार्य करायचे म्हणजे शरीर आणि मन सदृढ पाहिजे असे त्यांचे मत होते. बडोद्यात आल्यावर सुद्धा त्यांनी व्यायामाला फाटा दिला नाही. स्वत: ही नियमितपणे

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / १३