पान:महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यायाम करत असत. त्याचबरोबर बडोद्यातील प्रजेलाही व्यायामाचे महत्त्व पटावे म्हणून अंबुभाई आणि छोटुभाई पुराणी या व्यायाम क्षेत्रातील मान्यवरांच्या मदतीने बाजवाडा परिसरात लक्ष्मीनाथ व्यायामशाळा सुरू केली. अरविंद घोष या व्यायामशाळेला नियमित भेट देत.
 प्रो. माणिकराव यांचा बडोद्यातील जुम्मादादा आखाडाही क्रांतिकारी संघटनांचे आश्रयस्थान होते. या आखाड्यामध्ये प्रो. माणिकराव, खासेराव जाधव, माधवराव जाधव, केशवराव देशपांडे आणि अरविंद घोष यांच्या काही गोपनीय बैठका झाल्याच्या नोंदी सापडतात. याही आखाड्याला अरविंद घोष वारंवार भेट देत होते.
 अरविंद घोष बडोद्यात असतानाच त्यांनी क्रांतिकारक संघटना स्थापन केल्या तसेच अनेक क्रांतिकारी संघटनांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. जतीन बॅनर्जी या बंगाली सैनिकाला बडोद्यात गोपनीय रीतीने बोलावून त्यांनी बडोदा लष्कराचे प्रशिक्षण दिले होते. त्यांना विशिष्ट कार्यक्रम व योजना देऊन पुन्हा बंगालमध्ये धाडले होते. अनेक क्रांतिकारी संघटनांमध्ये त्यांनी बडोद्यात असतानाच सुसंवाद निर्माण केला होता. याच काळात त्यांनी शिक्षणासाठी 'भवानी मंदिर' नावाची भव्यदिव्य योजना उभारण्याचे ठरवले होते. ही योजना इंग्रजांच्या करड्या नजरेतून न सुटल्याने पूर्णत्वास गेली नाही.

महाराजा सयाजीराव आणि योगी अरविंद घोष / १४