Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दादाभाई नौरोजी, मादाम कामा, तारकनाथ दास, बिपीनचंद्र पाल, दिनशा वाच्छा, बॅ. विनायक सावरकर, बाबाराव सावरकर इ. लोकांना सयाजीरावांनी आर्थिक मदत केली होती.
 भगतसिंग बडोद्यात आश्रयाला आल्याचे पुरावे सापडतात. तर जवाहरलाल नेहरू लंडनमध्ये शिकत असताना रात्री १ वाजता गुप्तपणे सयाजीरावांना भेटल्याचे संदर्भ नेहरू समग्र वाड्मयात सापडतात. या पार्श्वभूमीवर महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी यांचे नाते तपासले असता भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ‘सयाजीकेंद्री’ भूमिकेतून नव्याने लिहिण्याची गरज अधोरेखित होते.
सयाजीराव : गांधीजींचा आदर्श

 गुजरातमध्ये आदरणीय व्यक्तींसाठी 'बापू' हे नामाभिधान प्रचलित आहे. संपूर्ण जग महात्मा गांधींना 'बापू' या नावाने बोलवत होते. परंतु स्वतः गांधीजी सयाजीरावांना आदराने 'बापू' म्हणत. यातच या दोघांमधील नात्याचे 'रहस्य' दडले आहे. गांधीजींना सयाजीराव वयाने मोठे असल्याने आदरार्थी होते असे नाही तर सयाजीरावांनी आपल्या कारकीर्दीत दाखविलेली उत्तुंग झेप महात्मा गांधींनाही आदर्शवत वाटत होती. महात्मा फुले त्यांच्या वयाच्या साठीत २०-२२ वर्षाच्या सयाजीरावांचा फोटो आपला आदर्श म्हणून बैठकीच्या खोलीत लावत होते. असाच आदर महान चित्रकार राजा रवी वर्मा यांना महाराजांबद्दल वाटत होता.

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / ७