Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्याबाबत राजा रवी वर्मा बडोद्याचे तत्कालीन दिवाण टी. माधवराव यांना म्हणतात, "वयानं लहान आणि अजाण असले तरी सयाजीराव महाराजांपुढं नतमस्तक होताना निर्भेळ आनंद मला लाभला, तो इतर राजांपुढे लाभेल की नाही याची मला दाट शंका आहे.” बडोद्याहून राजा रवी वर्मा एक वेगळाच अनुभव घेऊन आले होते. ते सर्वांना सांगत होते की, "तो कुमार राजा, पण त्याचं तेज वय विसरायला लावतं. आयुष्यात एक अनमोल स्नेहबंध घेऊन आल्याचा आनंद मी उपभोगत आहे." राजा रवी वर्मा यांचा हा अभिप्राय १८-२० वर्षाच्या तरुण सयाजीरावांबद्दलचा आहे. भारतात एखाद्या राज्याला त्याची विद्वत्ता आणि सुसंस्कृतपणा याबद्दल एवढा आदर अपवादानेच मिळाला असेल. जगभरातील विविध क्षेत्रातील विद्वान तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नेते सयाजीरावांना जो आदर देत होते तो श्रीमंत राजा म्हणून नव्हता तर मानवी जीवनातील आदर्शाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून होता.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पाठबळ

 १८९५ मध्ये सयाजीरावांनी पुणे येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला २,००० रु.ची मदत केली होती. १९०२ मध्ये अहमदाबाद येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन सयाजीरावांच्या हस्ते झाले होते. अहमदाबादमधील राष्ट्रीय काँग्रेसच्या या वार्षिक अधिवेशनाचे

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी / ८