पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीराव महाराजांना पहिल्या राणी चिमणाबाईंच्या मृत्यूनंतर निद्रानाशाचा आजार जडला. त्यावर अनेक उपाय करूनही फारसा उपयोग झाला नाही. परंतु कोल्हापूरच्या लक्ष्मीबाई जाधव यांचे गाणे ऐकून महाराजांना चांगली झोप लागू लागली. लक्ष्मीबाई जाधव या १९२२ ते १९४५ पर्यंत बडोदा दरबारात गायिका म्हणून कार्यरत होत्या. बडोद्यातील त्यांच्या यशस्वी कामगिरीमुळे त्यांना 'लक्ष्मीबाई बडोदेकर' या नावाने ओळख मिळाली. कोल्हापूरच्या क्षात्रपीठाचे' 'जगद्गुरू डॉ. कुर्तकोटींनी त्यांना 'संगीतचंद्रिका' ही पदवी बहाल केली.
 रुग्णांना दवाखान्यात संगीत ऐकवले तर त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ शकेल या गृहीतकानुसार बडोद्याच्या हॉस्पिटलमध्ये फय्याज खाँ यांना गायन करण्याचे आदेश महाराजांनी दिले. संगीताचा रुग्णाच्या आरोग्याशी संबंध जोडून महाराजांनी एक अभिनव प्रयोग केला. उस्ताद अब्दुल करीम खाँ आणि अब्दुल हक़ यांच्याकडून राजकुमार फत्तेसिंहराव जलतरंग हे वाद्य तर राजकुमार जयसिंहराव व शिवाजीराव हे दोघे उत्कृष्ट सतारवादन शिकले.
फुले परंपरेचा विकास

 महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत फुले-शाहू- -आंबेडकर यांचा जो वाटा आहे त्यापेक्षा अधिक योगदान महाराजांचे आहे.फुल्यांचे समाजसुधारणेचे कार्य पूर्णत्वाकडे नेण्याचे काम महाराजांनी केले. ‘शेतकऱ्यांचा असूड' या ग्रंथाच्या आरंभी

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / १८