पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथ लिहिले. यातील 'संस्कृत लक्षसंगीत' या ग्रंथात प्रचलित हिंदुस्थानी संगीतातील रागाची संपूर्ण माहिती देऊन त्याबद्दल चर्चा केली आहे. ‘संस्कृत अभिनवरागनंजिरी', 'हिंदुस्थानी संगीत पध्दती भाग १-४, ही पुस्तके मराठीत असून यात रागाचे उत्तम विवरण केले आहे. ‘हिंदुस्थानी संगीत क्रमिक पुस्तकमाला भाग १-४', या पुस्तकात हिदुस्थानातील प्रसिध्द गवैयांच्या उत्कृष्ट चिजा नोटेशनसह निरनिराळ्या रागात आणि तालात दिलेल्या आहेत. ही पुस्तके हिंदुस्थानातील सर्व भागातल्या संगीत पाठशाळेतून क्रमिक पुस्तके म्हणून आजही वापरली जातात. बडोदा गायन शाळेचे शिक्षक शिवराम सदाशिव मनोहर यांनी नाटकांच्या पदांचे नोटेशन असणारे पुस्तक 'संगीत शाकुंतल' हे पुस्तक लिहिले.

 भातखंडे आणि पंडित दत्तात्रय विष्णू पलुसकर हे महाराजांनी भरविलेल्या पहिल्या संगीत परिषदेत हजर होते. परंतु या परिषदेत इंग्रजी भाषेचा वापर जास्त केला गेला होता. हे पलूसकरांना आवडले नाही. त्यांच्या मताप्रमाणे गायन परिषद सर्वांना समजेल अशा भाषेत व्हायला हवी होती. बऱ्याच गायकांना इंग्रजी भाषा येत नव्हती. त्यामुळे ते तिथे रमले नाहीत असे संदर्भ सापडतात. परंतु महाराजांनी त्यांना व भातखंडेंना कलाभवनच्या औपचारिक तपासणीसाठी बोलावले होते व हे दोघेही तेव्हा बडोद्यात येऊन कलाभवनाचे संगीत विभागाची तपासणी करून गेले होते.

महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / १७