पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्याचे बिनोयतोष भट्टाचार्य
 बिनोयतोष भट्टाचार्य हे बौद्ध धर्मातील तंत्र संप्रदायावरील अधिकारी पंडित म्हणून जगविख्यात आहेत. १९२४ मध्ये सयाजीरावांनी त्यांना प्राच्यविद्या संस्थेच्या ' गायकवाड ओरिएंटल सिरिज'चे संपादक म्हणून बडोद्यात आणले. १९२७ त्यांना प्राच्यविद्या संस्थेचे संचालक केले आणि १९५२ ला भट्टाचार्य या पदावरून निवृत्त झाले. म्हणजेच एकूण २९ वर्षे हा बौद्धपंडित बडोद्यात होता. भट्टाचार्य यांचा 'टू वज्रयान वर्क्स' हा ग्रंथ १९२९ मध्ये प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथामध्ये तांत्रिक बौद्धवादाच्या उगम आणि विकासाचा इतिहास मांडण्यात आला. त्याचबरोबर ज्ञानसिद्धी ग्रंथातील उपदेशाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे.

 भट्टाचार्यांना त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान म्हणून महाराजांनी ‘राजरत्न' व 'ज्ञानज्योती' या पदव्या दिल्या होत्या. मूळचे बंगालचे असणारे भट्टाचार्य 'बडोद्याचे भट्टाचार्य' म्हणून जगभर ओळखले जात होते. ब्राह्मणी, जैन आणि बौद्ध या तिन्ही धर्माच्या तुलनात्मक अभ्यासातून त्यांनी बौद्ध धर्मातील तंत्र संप्रदायाचे अनन्य महत्त्व उजेडात आणले होते. ज्याप्रमाणे हिंदू तंत्र संप्रदायाने बौद्ध धर्मातील वज्रयानातून तांत्रिक संप्रदाय उसना घेतला आहे त्याचप्रमाणे महायान पंथातील तत्त्वज्ञांनी हेतुतः आणि जाणीवपूर्वक हिंदू देवता बौद्ध तंत्राशी जोडून घेतल्या. मध्ययुगीन हिंदू परंपरेतील शक्ती देवता आणि महायान पंथातील

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / २०