पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या पार्श्वभूमीवर या मालेत प्रकाशित झालेला एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे 'अ बुद्धिस्ट बिब्लिओग्राफी' हा होय. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर बौद्ध धर्माबाबत झालेल्या संशोधनाची सूची या ग्रंथात एकत्रित करण्यात आली आहे. हा ग्रंथ दोन खंडात असून पहिल्या खंडात पाली भाषेतील बौद्ध साहित्य, संस्कृत भाषेतील बौद्ध साहित्य, बौद्धेतर संस्कृत वाड्मयातील बौद्ध धर्माचे संदर्भ, युरोपियन भाषेतील बौद्ध साहित्याची चर्चा करण्यात आली आहे. या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात युरोपियन भाषेतील भारतीयांचे बौद्ध वाड्मय, श्रीलंका, ब्रह्मदेश, मलेशिया, जावा, कंबोडिया, हिमालयीन पट्ट्यातील, तिबेट, मध्य आशिया, मंगोलिया, चीन, कोरिया, जपान इ. १३ देशातील बौद्ध वाड्मयाचा आढावा घेणारी सूची देण्यात आली आहे. भारतातील अशा प्रकारचा बहुधा हा पहिला ग्रंथ असावा. या ग्रंथाच्या माध्यमातून महाराजांनी पुन्हा एकदा बौद्ध तत्त्वज्ञानाशी त्यांची असणारी बांधिलकी अधोरेखित केली आहे. हा ग्रंथ बुद्धाच्या जगभरातल्या स्वीकाराचा शोध घेणारा एक अद्वितीय प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे महाराजांच्या धर्म साक्षरता अभियानातील एक महत्वाचा टप्पासुद्धा आहे. म्हणूनच ही ग्रंथमाला म्हणजे 'वैश्विक भान जपणारा पहिला जागतिक धर्म साक्षरता उपक्रम ठरतो.

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / १९