पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘साक्षरता’ अभियान मुख्यतः भारताला केंद्रबिंदू मानून तयार केले होते. जगातील सर्व प्रमुख धर्मांचा समावेश असणारी ही ग्रंथमाला इंग्रजी भाषेत प्रकाशित झाल्यामुळे जागतिक 'संवाद' निर्माण करण्यासाठी ती 'मार्गदर्शक' होती.
 या मालेत पहिल्या वर्षी १९१८ मध्ये कोल्हापूरच्या करवीरपीठाचे शंकराचार्य कुर्तकोटी यांचा पीएच. डी. चा प्रबंध असणारा 'द हार्ट ऑफ भगवद्गीता' हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. कुर्तकोटींनी हा प्रबंध अमेरिकेतील ओरिएंटल युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. पदवीसाठी सादर केला होता. हा ग्रंथही ३०० पानांचा आहे. टिळक भक्त असणाऱ्या कुर्तकोटींनी टिळकांचे 'गीतारहस्य' १९९५ ला प्रकाशित झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन केले होते. भगवद्गीतेवरील हे बहुधा पहिले संशोधन असावे.

 या मालेत एकूण १७ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले होते. या प्रत्येक ग्रंथ ३००-४०० पानांचा आहे. म्हणजेच सुमारे ७ हजार छापील पानांचा मजकूर या अध्यासनाने प्रकाशित केला. या मालेतील पुस्तकांची अनुक्रमणिका चाळली असता एक विषय घेऊन त्या विषयाबद्दल जगातील वेगवेगळ्या धर्मामध्ये काय मांडणी केली आहे याची सखोल चर्चा आढळते. विशेष म्हणजे हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू या प्रमुख धर्मांबरोबरच ' तुलनात्मक धर्म अभ्यास' आणि 'नीतिशास्त्र' या विषयांवरील ग्रंथांचा त्यात समावेश होता.

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / १८