पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ओळखणारे सयाजीराव आधुनिक भारतातील पहिले प्रशासक आहेत. बडोद्याच्या सेन्ट्रल लायब्ररीमध्ये बुद्ध धर्मावरील जगातील सर्वोत्तम ग्रंथ उपलब्ध होते. आजही जगातील महत्त्वाच्या परंतु दुर्मिळ ग्रंथांच्या शोधात महाराष्ट्रातील अनेक विद्वान बडोदावारी करत असतात.
बडोद्यातील प्राच्यविद्या आणि बौद्ध धर्म
 १८८७ मध्येच महाराजांनी प्राच्यविद्या संस्थेच्या पायाभरणीला सुरुवात केली. प्रारंभीस ही संस्था बडोद्यातील मध्यवर्ती वाचनालयातील संस्कृत विभाग म्हणूनच कार्यरत होती. पुढे १९९५ मध्ये दुर्मिळ हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यासाठी सयाजीरावांनी 'गायकवाड ओरिएन्टल सिरिज' या महत्त्वपूर्ण ग्रंथ मालेची सुरुवात केली. प्राच्यविद्येसंदर्भातील कामाची व्याप्ती विचारात घेऊन १ सप्टेंबर १९२७ रोजी 'बडोदा प्राच्यविद्या मंदिर' या स्वतंत्र दर्जा असणाऱ्या संस्थेची विधिवत सुरुवात महाराजांनी केली.

 या प्राच्यविद्या संस्थेने बौद्ध धर्मावरील मूळ ग्रंथ प्रकाशित केले होते. महाराजांनी मराठीमध्ये बौद्ध धर्मावरील १७ ग्रंथ १९३६ पूर्वी म्हणजे बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या निर्णयापूर्वी प्रकाशित केले होते. सयाजीरावांनी दामोदर यंदेंना ग्रंथ प्रकाशनात बौद्ध धर्मावरील मराठी ग्रंथांना अग्रक्रम देण्याची सूचना केली होती. १९२४ पासूनच बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने मूळ बौद्ध ग्रंथांच्या पुनर्मुद्रनाचे काम सुरू केले. बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / १३