पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांनी महाराष्ट्रात बौद्ध धर्म प्रसारासाठी बाबासाहेबांच्या धर्मांतरापूर्वी ५० वर्षे साहाय्य करून चांगली सुरुवात केली होती असे म्हणता येईल. यावेळी कोसंबींनी सयाजीरावांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाली भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु करण्याची विनंती केली. महाराजांनी कोसंबींची ही विनंती मान्य करून दरमहा पंधरा रुपयांच्या दोन आणि दहा रुपयाच्या दोन अशा चार शिष्यवृत्ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरू केल्या. या चार शिष्यवृत्ती १९१२ ते १९१८ या कालावधीत कोसंबी फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरीत असेपर्यंत सुरू होत्या. विशेष म्हणजे मुंबई प्रांतातील पाली भाषा शिकवले जाणारे हे एकमेव कॉलेज होते. मुंबई प्रांतात पाली भाषेसाठी शिष्यवृत्ती सुरू करणारे सयाजीराव पहिले प्रशासक ठरतात.
 महाराजांनी १९३० पासून बडोदा कॉलेजसह बडोदा हायस्कूलमध्येसुद्धा पाली भाषा शिकवण्याची व्यवस्था केली. कोसंबींचे फर्ग्युसन कॉलेजमधील विद्यार्थी चिंतामण वैजनाथ राजवाडे हे बडोदा कॉलेजमध्ये पाली भाषेचे पहिले प्राध्यापक होते. महाराजांच्या आज्ञेवरून प्राध्यापक राजवाडे यांनी ' दीघनिकाय' या बौद्ध ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून तीन भागात प्रसिद्ध केले.

 पाली भाषेच्या संवर्धनामागे सयाजीरावांची भूमिका महाराष्ट्राला परिचित नाही. पाली भाषेतील बौद्ध साहित्य बुद्धाच्या समतावादी तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी महत्त्वाचे आहे हे

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / १२