पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्राच्यविद्यापंडित म्हणून नावारूपाला आले. १९१२ मध्ये अमेरिकेहून परतल्यानंतर भारताला पहिल्यांदा मार्क्सवादाचा परिचय करून देणाऱ्या धर्मानंद कोसंबींच्या अमेरिकावारीला परवानगी देऊन सयाजीरावांचा हातभार लागला. कोसंबी पुढे एकूण चार वेळा बौद्ध धर्माच्या अभ्यासानिमित्त अमेरिकेला गेले. येथे अजून एका बाबीचा उल्लेख मनोरंजक ठरेल. ती बाब म्हणजे धर्मानंद आणि मार्क्सवाद होय. १९१२ मध्ये कोसंबींनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत कार्ल मार्क्सवर भाषण दिले. तो कार्ल मार्क्सचा भारताला परिचय करून देण्याचा पहिला सार्वजनिक प्रयत्न होता. कॉ. डांगे यांनी मार्क्सच्या विचारधारेवरील 'सोशॅलिस्ट' हे नियतकालिक १९२२ ला सुरू केले व १९२५ ला भारतीय मार्क्सवादी पक्षाची स्थापना केली. म्हणजे डांगेंच्या अगोदर दहा वर्षे कोसंबींनी मार्क्स भारतात आणला. कोसंबींना मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा परिचय अमेरिकेत झाला. म्हणजेच मार्क्स भारतात आणण्यामध्ये काही अंशी सयाजीरावांचा हातभार होता.
पाली भाषा आणि महाराजा सयाजीराव

 १९१२ मध्ये धर्मानंद कोसंबी अमेरिकेहून परतले व त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाली भाषेचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. विशेष म्हणजे ही नोकरी कोसंबींना मिळवून देण्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचा मोठा वाटा होता.

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / ११