पान:महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्मानंद कोसंबी आणि महाराजा सयाजीराव
 धर्मानंद आणि सयाजीराव यांच्या १९०६ पासूनच्या नात्याचा धागा बौद्ध धर्म हाच होता. १९०८ ते १९११ अशी तीन वर्षे बौद्ध धर्मविषयक ग्रंथलेखन करण्यासाठी आणि महाराष्ट्रात बौद्ध धर्म व पाली भाषेचा प्रसार करण्यासाठी महाराजांनी धर्मानंद कोसंबींना दरमहा ५० रुपयांची शिष्यवृत्ती दिली होती. पुढे १९५६ मधील बाबासाहेबांचे धर्मांतरसुद्धा या पार्श्वभूमीवर आपल्याला विचारात घ्यावे लागेल. १९०९ मध्ये धर्मानंदांनी बडोद्यात बौद्ध धर्मावर ५ भाषणे दिली. त्यातील ३ भाषणे 'बुद्ध, धम्म आणि संघ' या नावाने छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपात आज उपलब्ध आहेत. या पुस्तकाच्या छपाईसाठी सयाजीरावांनी ५०० रु. ची मदत केली. १९१० मध्ये कोसंबींना अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात प्रा. वॉरन यांच्या बौद्ध धर्मातील 'विशुद्धी मार्ग' या ग्रंथावरील संशोधनात सहकार्य करण्यासाठी बोलविण्यात आले होते. महाराजा सयाजीरावांची परवानगी घेऊन ते १९१० मध्ये हार्वर्ड विद्यापीठात गेले. ज्यावर्षी कोसंबी बौद्ध धर्मावरील संशोधनाला मदत करण्यासाठी अमेरिकेला गेले त्याचवर्षी महाराजांनी बडोद्याच्या ज्युबिली बागेत बुद्धाचा पुतळा बसविला होता.

 ही अमेरिकावारी बौद्ध धर्माच्या कामासाठी व कोसंबींचा मुलगा दामोदर यांच्या शिक्षणासाठीसुद्धा फलदायी ठरली. हेच दामोदर कोसंबी पुढे भारतातील सर्वात महत्त्वाचे

महाराजा सयाजीराव आणि बौद्ध धर्म / १०