पान:महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्याविषयी बालगंधर्व आत्मचरित्राच्या टिपणात म्हणतात-
 " अशी विशुध्द, निरपेक्ष रसिकता आणि औदार्य आता दुर्लभच !” गंधर्व नाटक मंडळी विसर्जित झाली तेव्हा सयाजीरावांना काय वाटलं त्याची नोंद कुठे आढळत नाही. १९३९ साली महाराज दिवंगत झाले तेव्हा बालगंधर्वांचा मोठा आधारस्तंभ गेला.
( 'ताटवे अरविंद, २००३, बालगंधर्व, पान नं ५८-५९ )  महाराजांचा असा एक नियम होता की, नाटकाचे खेळ भल्या पहाटेपर्यंत चालू नयेत. नाटक कटाक्षाने रात्री आठ वाजता सुरू होऊन मध्यरात्रीपूर्वी संपावे. पण हे सगळे कडक बंधनं तेव्हा पाळली जात असत, जेव्हा महाराज जातीने कार्यक्रमाला हजर असत. अन्यथा कलावंताच्या रक्तात वर्षानुवर्ष भिनलेला कालहरणाच्या सवयीत काडीमात्र फरक पडलेला नव्हता. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की कलाकार हा नेहमी मुडीच असतो; पण सयाजीराव महाराजांनी त्यांनासुध्दा शिस्त लावण्याचे प्रयत्न केलेले दिसतात.
बालगंधर्वांचे ब्लाऊज

 गंधर्व कंपनीने महाराजांना दरवेळेस नवीन प्रयोग दाखविला पाहिजे असाही महाराजांचा नियम होता. महाराणी चिमणाबाईंना बालगंधर्वांची संगीत नाटके फार आवडत. बालगंधर्वांच्या चोळ्या (ब्लाऊज ) महाराणी चिमणाबाईंना फार आवडत असत. त्या बालगंधर्वांचे ब्लाऊज गुपचूप राजमहालात मागवून घेत.

महाराजा सयाजीराव आणि बालगंधर्व / १६