पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अमीर खाँचे जलतरंग वादन झाले. ते राजकुमारांना खूप आवडले. त्यांनी मातुः श्रींना हे वादन शिकायची इच्छा असल्याचे सांगितले. त्यानुसार चिमणाबाईंनी अब्दुल करीम खाँनकडे राजकुमारांची जलतरंग शिकण्याची इच्छा बोलून दाखविली व त्यांच्या या शिक्षणास सुरुवात झाली.
 या गायन आणि वादनाच्या तालमीने राजकुमार आणि 'अब्दुल करीम खाँ व अब्दुल हक्क या दोन्ही बंधूची इतकी सलगी झाली की, शिकार, घोड्यावर बसणे, खेळणे वगैरेही एकत्र होऊ लागले. इतर सरदारांची मुलेही त्यांच्या संगतीत आली. मुलांची संगीत शास्त्रातली प्रगती सरदार माने व खासेरावांनी महाराजांच्या कानावर घातली. त्यांना खूप समाधान वाटले. राजकुमार फत्तेसिंह जलतरंग वाजवण्यात तरबेज होत होते. राजकुमार जयसिंहराव व शिवाजीराव सतार वाजवायला शिकत होते. तर इंदिराराजे गायनामध्ये प्रगती करत होत्या.
महाराजांचे गायन परिषदेतलं भाषण, १९२९

 १० मार्च १९२९ रोजी बडोदे येथील राजवाड्याच्या विशाल दिवाणखान्यात गायनपरिषद भरली होती. महाराजांनी या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या भाषणात संगीताचे महत्व अधोरेखित केले आहे. संगीत म्हणजे जीवनाला माधुरी व रमणीयता देणारी वल्ली आहे. मनाला मेणाहून मऊ करण्याची किंवा कठीण करण्याची कला संगीताच्या अंगी असते. दयेचा पाझर फोडण्याचे, आनंदाचे किंवा दुःखाचे अश्रू झिरपायला

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ३३