पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/३४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लावायचे व वीरश्रींचा संचार करण्याचे सामर्थ्य संगीताच्या ठायी असते. अशा उपयुक्त कलेला उत्तेजन द्यावे व प्रजेला संगीताची गोडी लावावी म्हणून त्यांनी राज्यात शाळा काढून त्यांच्याद्वारे त्या कलेचा प्रसार करण्याची व्यवस्था केली.
 पुढे या भाषणात त्यांनी आपण संगीत कलेसाठी आजपर्यंत कोणते प्रयत्न केले याविषयी सांगितले. पण माझ्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश आलेले नाही याला दोन कारणे आहेत असे ते म्हणाले. एक म्हणजे, आपल्या कडील संगीततज्ञांना आपले स्वतःचे ज्ञान लपवून ठेवण्याची आणि आपल्या पट्टशिष्यांनाही ते न देण्याची असलेली सवय हे होय. दुसरे कारण असे की, इकडच्या लोकांची आपल्या आयुष्यात सात्त्विक आनंदाचा पूर्ण उपभोग घेण्याची प्रवृत्ती फार कमी आहे हे होय. याला आपल्या इकडचे दारिद्रय, औद्दोगिक क्रांती वगैरे गोष्टी बऱ्याच अंशी कारणीभूत असल्या, तरी आपला नित्याचा उदयोग अधिक चांगल्या रीतीने करता येण्यास संगीताचा फार उपयोग होतो,या दृष्टीनेही त्या कलेचे ज्ञान संपादन करणे व त्याच्याबद्दल आपली अभिरुचि वाढविणे अवश्य आहे.

 शेवटी महाराज म्हणाले, “कोणत्याही देशाच्या संस्कृतीची किंमत जर आपल्याला अजमावयाची असेल, तर त्या देशांतील ललितकलांकडे आपण लक्ष द्यावे. गायन, चित्रकला आणि शिल्पकला या तीन कला राष्ट्राच्या संस्कृतीची चिन्हें आहेत व त्यांच्यापासून राष्ट्राला प्रकाश व चैतन्य प्राप्त होते असे माझें ठाम मत आहे." याप्रमाणे आपल्या राज्यात कलांचा विकास व्हावा

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ३४