पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/२७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केली. शिरगावकरांनी गंधर्व कंपनीची माहिती काढून राजाश्रयास योग्य असल्याची खात्री झाल्यावर महाराजांकडे गंधर्व कंपनीची शिफारस केली. त्यांना बडोदा संस्थानचा राजाश्रय मिळाला. बालगंधर्व महाराजांची आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्षातून एक महिना बडोद्यास जात असत. लोकप्रियतेमुळे त्यांची नाटकं बडोदा दरबारीही रंगू लागली. महाराजांकडून गंधर्व कंपनीला ५००० रु. वर्षासन मिळू लागले.
 बालगंधर्व बडोद्यात जात तेव्हा त्यांचा पहिला नाट्यप्रयोग राजवाड्यात खाजगीत होत असे. तेव्हा त्यांना एक हजार रूपये देऊन महाराज त्यांचा सन्मान करीत असत. त्यांच्या सर्व सहकलाकारांनाही तेवढाच मान दिला जाई. त्यांच्या सन्मानार्थ महाराज चार हजार रूपये देत असत. महाराजांच्या कुटुंबातल्या स्त्रियांकडून बालगंधर्वांना किमती शालू भेटीदाखल मिळत असत. याखेरीज दरवर्षी महाराज गंधर्व नाटक मंडळीवर दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करीत असत. यासंदर्भात बालगंधर्व आपल्या आत्मचरित्राच्या टिपणात म्हणतात, “अशी विशुध्द, निरपेक्ष रसिकता आणि औदार्य आता दुर्लभच!” महाराजांनी बालगंधर्वांच्या नाटक कंपनीला “श्री. म. सयाजीराव गायकवाड राज्य बडोदे यांचा खास आश्रयाखाली” अशी जाहिरात करण्याची अनुमती दिल्याबद्दल बालगंधर्वांना याचा नेहमी अभिमान वाटत असे.

 गंधर्व कंपनीने दरवेळेस नवीन प्रयोग दाखविला पाहिजे असा महाराजांचा नियम होता. १९१७ च्या सुमारास राम गणेश गडकरी

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / २७