पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पारंपरिक समाजात माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचा लाभ केवळ उच्चजातीयांनी घेतल्यामुळे कारागीर वर्ग शिक्षणापासून वंचित राहिला. या वर्गाला केवळ प्राथमिक शिक्षण देऊन त्यांची स्थिती सुधारण्याची शक्यता नव्हती. त्याऐवजी कारागिरी व इतर हुन्नर उद्योग करणाऱ्या लोकांना नवीन कौशल्याधारित तांत्रिक शिक्षण देण्याची आवश्यकता सयाजीरावांना जाणवली. १८८६ पासून तांत्रिक शिक्षणाचा समावेश संस्थानच्या शैक्षणिक धोरणात करण्याबाबत महाराज विचार करत होते. या कामात सयाजीरावांना जगप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ टी. के. गज्जर यांची महत्त्वपूर्ण साथ लाभली. गज्जर यांनी १८८६ मध्ये सुरत तंत्रशिक्षण देणारी पॉलिटेक्निक संस्था उभारण्याची आवश्यकता विशद केली अशा प्रकारच्या संस्थेची उद्दिष्टे, या संस्थेला पूरक इतर आवश्यक संस्था आणि कार्यपद्धती आपल्या ‘A Proposal For A Polytechnic Academy At Surat' या प्रस्तावात मांडली होती. कृषी आणि औद्योगिक कलांमध्ये पारंगत कामगार वर्गाला त्यांच्या व्यवसायाची वैज्ञानिक तत्त्वे शिकवणे व त्या ज्ञानाचे प्रयोगशाळा आणि कारखान्यांमध्ये प्रात्यक्षिक दाखवणे हा या संस्थेच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश त्यांनी नमूद केला होता.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / ७