पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्यातील तांत्रिक शिक्षणाची व्याप्ती
 १९३५-३६ ला कलाभवनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५४० होती. ती ५ वर्षांत १९३९-४० मध्ये ६०५ वर पोहोचली. १९३९-४० मध्ये कलाभवनमध्ये शिक्षण घेणाऱ्या ६०५ विद्यार्थ्यांपैकी १३१ विद्यार्थी मेकॅनिकल, ८० इलेक्ट्रिकल, ८८ सिव्हिल, ८८ केमिकल, ६१ विविंग, ६७ आर्किटेक्चर, ४९ कॉमर्स विभागात शिकत होते. या वर्षी कलाभवनवर बडोदा संस्थानकडून १ लाख ५७ हजार रुपये खर्च करण्यात आले.
 १८९१ पर्यंत बडोद्यात सार्वजनिक काम आणि खाजगी अशा दोनच विभागांकडे मोठी वर्कशॉप्स होती. या वर्कशॉप्समध्ये संबंधित विभागांना आवश्यक वस्तूंचे उत्पादन आणि जुन्या वस्तूंची दुरूस्ती केली जात असे. राज्याच्या इतर विभागांना आवश्यक वस्तूंचे उत्पादन आणि दुरूस्ती सार्वजनिक काम विभागाच्या वर्कशॉपमध्ये, स्थानिक किंवा बडोद्याबाहेरील कारागिरांकडून करून घ्यावे लागत होते. १८९२ मध्ये सुरुवातीला या दोन वर्कशॉप्सचे एकत्रीकरण करून एकच वर्कशॉप चालू करण्याचा निर्णय सयाजीरावांनी घेतला होता. हे वर्कशॉप आवश्यक यंत्रसामग्रीने युक्त व्यावसायिक तत्त्वावर चालवण्याचा त्यांचा मानस होता. परंतु नव्याने चालू झालेल्या कलाभवनसाठी स्वतंत्र सुसज्ज वर्कशॉपची आवश्यकता होती. त्यामुळे या तिन्हीसाठी एकच वर्कशॉप चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / २३