Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवलेल्या निधीच्या व्याजातून दरवर्षी ४ रु.च्या शिष्यवृत्ती बडोदा संस्थानच्या विद्यार्थ्यांना दिल्या जात. याशिवाय कलाभवनच्या विविध विभागांमध्ये अंतिम परीक्षेत प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पदके आणि बक्षिसे दिली जात. कलाभवनबरोबरच बडोदा संस्थानातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कला व औद्योगिक शाळा सुरू करण्यात आल्या. बडोदा सरकारतर्फे २० रुपयांच्या चार स्कॉलरशिप कारागीर जातींसाठी सुरू करून त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
 कलाभवनचे शैक्षणिक वर्ष दोन सत्रांमध्ये विभागले होते. पहिल्या सत्राची सुरुवात २१ नोव्हेंबर व दुसऱ्या सत्राची सुरुवात ६ मे रोजी होत असे. कला आणि व्यापारविषयक तंत्रज्ञान या दोन शाखा वगळता इतर शाखांमधील प्रवेशासाठी दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतली जात असे. या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात असे. कलाभवनमध्ये शिक्षण घेण्यासाठी बडोदा प्रांताबरोबरच बडोद्याबाहेरील विद्यार्थीसुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्सुक होते. १९३०-३१ या शैक्षणिक वर्षात कलाभवनमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये बडोदा संस्थानातील विद्यार्थ्यांचे प्रमाण निम्मे होते. पुढील १० वर्षांच्या काळात सुरुवातीला हे प्रमाण काही अंशी कमी होऊन दशकाच्या शेवटी ६५ टक्क्यांपर्यंत वाढले. त्या तुलनेत मुंबई प्रांत व भारताच्या इतर प्रांतातून कलाभवनमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सातत्याने घटत गेले.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचे कलाभवन / २२