पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



चित्रांसमोर डोके टेकवून नमस्कार केले. त्रिवेंद्रमनंतर राजा रवी वर्मा मुंबईला आले. महाराजा सयाजीरावांच्या परवानगीने त्यांनी मुंबईत त्या चित्रांचे प्रदर्शन भरविले. मुंबईत हजारो लोकांनी ही चित्रे पाहिली आणि त्या चित्रांचे काढलेले फोटो भारतभर वाटले गेले.

 ही चित्रे घेऊन राजा रवी वर्मा बडोद्याला आले. महाराजांनी त्यांना संपूर्ण राजवाडा फिरून दाखवला. ज्या ठिकाणी ही चित्रे लावायची होती तो दरबार हॉलही दाखवला. दरबार हॉलमध्ये कोणते चित्र कोठे लावायचे हे स्वातंत्र्य महाराजांनी रवी वर्मांना दिले. राजा रवी वर्मांच्या इच्छेनुसार दरबार हॉलमध्ये चित्रे लावण्याअगोदर बडोद्यातील लोकांसाठी त्यांचे प्रदर्शनही ठेवण्यात आले. महाराजांनी या कृष्णधवल चित्रांचे रंगीत करून विकण्याची कल्पना राजा रवी वर्मांना दिली. महाराजांची ही कल्पना किती महान होती याचा प्रत्यय आज येतो. कारण ही चित्रे आज भारताबरोबर सर्व जगभर प्रसिद्ध आहेत. या चित्र मालेत पुढील चौदा चित्रांचा समावेश होतो. १. श्रीरामचंद्राचा विवाह २. श्रीकृष्णाची दृष्ट ३. गंगा आणि शंतनू ४. कारागृहातून श्रीकृष्णाला वासुदेव घेऊन निघतो ५. मत्स्यगंधा ६. विश्वामित्र मेनका ७. कीचक आणि सैरंध्री ८. हरिश्चंद्र तारामतीच्या वधास उद्युक्त झाला आहे. ९. राधामाधव १०. भरत ११. कंस आणि माया १२. यतिवेषधारी अर्जुन आणि सुभद्रा, १३. नलदमयंती, १४. द्रौपदी वस्त्रहरण.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / १२