पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. राजवाड्याचा दरबारगृह सजवण्यासाठी महाराजांना राजा रवी वर्माकडून काही तैलचित्र तयार करून हवी होती. त्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रामायण, महाभारत, पुराणे यातील कथांवर आणि प्रसंगांवर आधारलेली चित्रे त्यांना अपेक्षित होती. त्याच वेळी राजवाड्याच्या दरबार हॉलसाठी १२- १४ चित्रांची आवश्यकता सर टी. माधवरावांनी व्यक्त केली. ही चित्रे काढण्यासाठी भारतभर अभ्यास पर्यटन करावे लागणार होते. यासाठी राजा रवी वर्मा आपले बंधू राज वर्मा यांना सोबत घेऊन ३-४ महिने भारत भ्रमंती करून आपल्या मूळगावी किलीमानूरला आले. परंतु या चित्रांसाठीचा त्यांचा अभ्यास समाधानकारक झाला नव्हता. ते थोडे निराश झाले. परंतु त्यांचे चित्रकार मामा राज वर्मा यांनी त्यांना 'तुझ्या कल्पनेप्रमाणे तू रामायण, महाभारत सादर कर' असा सल्ला दिला.

 राजा रवी वर्मांनी या कामाला स्वतःला झोकून दिले. पौराणिक कथेतले एक एक चित्र पूर्ण करत चौदा चित्रे पूर्ण झाली. त्यासाठी त्यांनी व्यास- वाल्मीकी, नल-दमयंती, अर्जुन- सभा द्रौपदीवस्त्रहरण, हरिश्चंद्र-तारामती, सीतास्वयंवर, देवकी - कृष्ण, असे अनेक विषय निवडले होते. ही चित्रे पूर्ण झाली तेव्हा त्या कलाकृतींची त्रिवेंद्रममध्ये खूप चर्चा झाली. त्रिवेंद्रम महाराज आणि बडोद्याचे महाराज यांच्या परवानगीने त्या चित्रांचे प्रदर्शन प्रथम त्रिवेंद्रममध्ये भरविले गेले या प्रदर्शनाला शेकडो लोकांची गर्दी झाली. येणाऱ्या लोकांनी देवांची चित्रे म्हणून भाविकपणे

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / ११