पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लक्ष्मीविलास पॅलेसमधील शिल्पकला
 राजवाड्याचा दर्शनी भाग शिल्पकलेने ओतप्रोत भरला आहे. हे शिल्पकाम मिश्र स्वरूपात केलेले दिसते, त्यात हिंदी शिल्पकला पद्धत वापरली असून, यातील काही कमानीत व्हेनिसची शिल्पकला व काही गॉथिक शिल्पकलेचा मिलाप बघावयास मिळतो. मुख्य दरबाराच्या दिवाणखान्याची फरशी व्हेनिसच्या पद्धतीची असून त्यावर इटालियन शिल्पकार फेलिसी याने चित्रकला, काव्यकला, मूर्तिकला व शिल्पकला या चार ललितकलांचे दर्शक पुतळे उभे केले होते, मुख्य दरवाजाला महिरप नोट आहे. त्यावरही सुंदर कोरीव काम केलेले आहे, दरवाजाची जी महिरप आहे तिच्यातील समांतरपणा, त्याच्यावर असलेले कोरीव काम अप्रतिम आहे.

 हा इटालियन शिल्पकार फेलिसी १८९३ मध्ये महाराजांनी बडोद्यास आणला होता. पुढे १८९७ पर्यंत त्याला बडोद्यात ठेऊन घेतले. त्याच्याकडून आरसपानाचे व ब्राँझचे पुतळे तयार करून घेऊन राजवाड्यात ठेवले आहेत. फेलिसीने महाराणी साहेबांचा उत्कृष्ट पूर्णाकृती पुतळा केला आहे. महाराजांचे वडील काशीराव गायकवाड यांची ब्राँझ धातूची पूर्णाकृती बैठी मूर्ती पर्यटकांना फारच आकर्षित करते. ही मूर्ती बनविताना काशीरावांच्या व्यक्तिमत्त्वातील बारकावे हुबेहूब टिपल्याचे दिसतात. तसेच महाराजांचे चिरंजीव फत्तेसिंहराव व जयसिंहराव यांचाही ब्राँझचा जोड पुतळा तयार केला आहे.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस / १३