पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अमेरिका खंडातील गयाना येथे बँक ऑफ बडोदाची शाखा सुरू झाली. याच वर्षी भारत-पाकिस्तान युद्धामुळे बडोदा बँकेला पूर्व पाकिस्तानातील नारायणगंज येथील शाखा बंद करावी लागली. तर १९६७ मध्ये टांझानिया देशातील सरकारने दार-ए-सलाम, म्वांगा आणि मोशी येथील बडोदा बँकेच्या तीन शाखांचे राष्ट्रीयीकरण करून नॅशनल बँकिंग कॉर्पोरेशन या सरकारी संस्थेकडे सोपवल्या.
 १९७२ मध्ये भारत सरकारच्या बँक ऑफ इंडियाचे युगांडा देशातील सर्व आर्थिक व्यवहार बडोदा बँकेकडे सोपवण्यात आले. १९७४ मध्ये दुबई आणि अबुधाबी येथे बडोदा बँकेच्या शाखा स्थापन झाल्या. तर दोन वर्षांनी १९७६ मध्ये ओमन देशामध्ये आणि बेल्जियममधील ब्रुसेल्स शहरात बडोदा बँकेच्या शाखा सुरू करण्यात आल्या. बेल्जियममधील अँटवर्प ( Antwerp) शहरातील ज्वेलरी आणि हिऱ्यावरील नक्षीकामाच्या व्यवसायात मुंबईस्थित अनेक व्यापारी संस्था गुंतवणूक करत. या संस्थांना बँकिंग सेवा पुरवण्याच्या उद्देशाने ब्रुसेल्स येथील शाखा सुरू करण्यात आली होती.
 १९७८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये बडोदा बँकेची शाखा स्थापन करण्यात आली. १९८० मध्ये बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या तीन बँकांनी एकत्रितपणे हाँगकाँग येथे आय.यू. बी. इंटर नॅशनल फायनान्स या ठेवी स्वीकारणाऱ्या परवानाधारक संस्थेची स्थापना केली.

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / ३८