पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराज यांच्या व्यावहारिक नात्याच्या यशाने रिपब्लिक ऑफ कोलंबियाचे आर्थिक सल्लागार लाऊचीन करी यांनी मांडलेले आर्थिक सल्लागाराचे सूत्र पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.” आनंद चंदावरकर यांनी सप्रमाण मांडलेले हे मत सयाजीरावांचे अनन्यत्व सिद्ध करते.
 तत्कालीन संपूर्ण जगाने आर्थिक क्षेत्रातील ब्रिटिश तज्ज्ञांची श्रेष्ठता मान्य केली असताना आणि ब्रिटिश आर्थिक तज्ज्ञ सहजासहजी उपलब्ध होत असतानादेखील सयाजीराव महाराजांनी त्याऐवजी अमेरिकन तज्ज्ञ व्हाईटनॅक यांची निवड का केली हे समजून घेणे आजही अत्यावश्यक ठरते. अभियांत्रिकी आणि स्थापत्यकलेसारख्या क्षेत्रात ब्रिटिश अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यामुळे बडोदा संस्थान आणि ब्रिटिश सरकार यांच्यात हितसंबंधाविषयी संघर्ष निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. . त्यामुळेच सयाजीरावांनी आपल्या संस्थानात आर.एफ. चिशोलम आणि मेजर मंट या ब्रिटिश स्थापत्यशास्त्रज्ञांची नियुक्ती केली होती. या स्थापत्यशास्त्रज्ञांनी लक्ष्मीविलास राजवाडा, कामाठी बाग आणि ब्रिटिश रेसिडेन्सीच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परंतु बँकिंग आणि उद्योगाप्रमाणेच आर्थिक क्षेत्रातील बडोद्याच्या प्रगतीमुळे ब्रिटिश सरकार आणि संस्थान यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची भीती सयाजीराव महाराजांना वाटत होती. भविष्यात निर्माण होऊ शकणारा हा संघर्ष टाळण्यासाठी सयाजीरावांनी व्हाईटनॅक यांची आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती केली.

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / १८