पान:महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 व्हाईटनॅक यांच्या नियुक्तीसाठी अन्य एक कारणदेखील तितकेच महत्त्वाचे ठरले. या संदर्भात आनंद चंदावरकर पुढे लिहितात, " व्हाईटनॅक हे अन्य ब्रिटिश अर्थतज्ज्ञांप्रमाणे हस्तिदंती मनोऱ्यातून समाजाकडे पाहणारे अर्थतज्ञ नव्हते. तर त्यांना अर्थशास्त्राच्या सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव होता. व्हाईटनॅक हे भारतात अध्यापनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्षेत्रात नियुक्त होणारे पहिले अमेरिकन तज्ज्ञ होते.” ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यांचा मेळ घालणाऱ्या व्हाईटनॅक यांची आर्थिक सल्लागारपदी सयाजीरावांनी केलेली नेमणूक त्यांच्या दूरदर्शित्वाचा पुरावाच देते. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ बडोदाच्या स्थापनेची पार्श्वभूमी आणि बडोद्याच्या आर्थिक विकासातील बँकेचे योगदान 'समजून घेणे अत्यावश्यक ठरते.
बँक ऑफ बडोदाच्या स्थापनेची पार्श्वभूमी
 राज्याधिकार प्राप्तीनंतर बडोद्याच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील राहिलेल्या सयाजीरावांनी १८९४ मध्ये संस्थानच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्याच्या उद्देशाने औद्योगिक आयोगाची स्थापना केली. या आयोगामध्ये तीन शासकीय आणि एक बिगर शासकीय अशा एकूण चार सदस्यांचा समावेश होता. बडोद्यातील बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. जनतेला किफायतशीर पद्धतीने पतपुरवठा करण्यासाठी प्रत्येक प्रांतात शासकीय बँकेची स्थापना करण्याची

महाराजा सयाजीराव आणि बँक ऑफ बडोदा / १९