पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेतल्यानंतर ७ व्या वर्षी म्हणजेच वयाच्या २४ व्या वर्षी महाराजांमध्ये स्पष्टपणे आढळते. ही बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेची खऱ्या अर्थाने पायाभरणीच होती. पुढे १८९३ मध्ये पाटण येथील जैन भांडारात सापडलेल्या हस्तलिखितांच्या संवर्धनाची व त्या हस्तलिखितांवरील अभ्यासाची सुरुवात झाली. हा बडोद्यातील प्राच्यविद्या संशोधनाचा आरंभ होता. याचवर्षी बडोद्यातील विठ्ठल मंदिरातील संस्कृत हस्तलिखितांचा संग्रह करण्यात आला. १९९० नंतर या संस्कृत हस्तलिखितांचे संवर्धन बडोद्याच्या सेंट्रल लायब्ररीत करण्यात आले. यासंग्रहात महाराजांचे बंधू संपतराव गायकवाड यांच्या ६३० छापील वैयक्तिक ग्रंथसंग्रहाची भर पडली. पुढे यज्ञेश्वर शास्त्री यांच्या ४४६ हस्तलिखितांसह छापील ग्रंथ याचबरोबर महाराणी चिमणाबाई यांच्याकडून राजवाड्यातील ५ चित्रांची धातुपट्टी या संग्रहास भेट मिळाली. यामध्ये महाभारत (लांबी २२८ फूट), भागवत (लांबी ८४ फूट), भगवद्गीता (लांबी १०॥ फूट) आणि हरिवंश (लांबी ४८ फूट) यांचा समावेश आहे. प्रारंभी पाटण व इतर काही ठिकाणाहून हस्तलिखितांचे संकलन, अध्ययन व अनुवादाची जबाबदारी महाराजांनी मणिभाई, नभुभाई द्विवेदी, अनंतकृष्ण शास्त्री यांच्यावर सोपविली.

 अनंतकृष्ण शास्त्री यांच्याकडे संपूर्ण भारतभर फिरून प्राचीन हस्तलिखिते जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली. सात वर्षाच्या भ्रमंतीतून त्यांनी १०,००० हस्तलिखिते जमा केली.

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / ९